Home Cities जळगाव सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्या जळगावात शांततापूर्ण आंदोलन; नागरिकांना सहभागाचे आवाहन

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्या जळगावात शांततापूर्ण आंदोलन; नागरिकांना सहभागाचे आवाहन

0
24

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी जळगावात सोमवारी, 20 जुलै रोजी शांततापूर्ण निदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. जळगावकर जागृत नागरिकांच्या वतीने दुपारी 12 वाजता शिवतीर्थ (छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ) हे आंदोलन होणार असून, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळत असताना, जळगावातील नागरिकही नैतिक पाठिंबा व्यक्त करण्यासाठी एकत्र येणार आहेत. या आंदोलनातून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, पर्यावरण संरक्षणासाठी प्रभावी आणि संवेदनशील निर्णय घ्यावेत तसेच लोकशाही मार्गाने मांडल्या जाणाऱ्या जनभावनांचा आदर करावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.

आयोजकांच्या म्हणण्यानुसार, शांततापूर्ण आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईबाबतही या निदर्शनातून चिंता व्यक्त करण्यात येणार आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला शांततेच्या मार्गाने आपले मत मांडण्याचा घटनात्मक अधिकार अबाधित राहावा आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण व्हावे, अशी भूमिका या आंदोलनातून मांडली जाणार आहे. या निदर्शनात जळगाव शहर व जिल्ह्यातील विद्यार्थी, तरुण-तरुणी, शिक्षक, पालक, सामाजिक संस्था, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सर्व जागरूक नागरिकांनी कोणताही पक्षीय भेद बाजूला ठेवून सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य, पर्यावरण संवर्धन आणि लोकशाही मूल्यांचे जतन हा संपूर्ण समाजाचा विषय असल्याने प्रत्येक सजग नागरिकाने शांततापूर्ण पद्धतीने आपला सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. जळगावात होणाऱ्या या निदर्शनाकडे नागरिकांसह विविध सामाजिक संघटनांचे लक्ष लागले असून, मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound