Home Cities चोपडा महिला सुरक्षेसाठी अडावद पोलिस ॲक्शन मोडवर ; ३ रोड रोमियोंवर कारवाई

महिला सुरक्षेसाठी अडावद पोलिस ॲक्शन मोडवर ; ३ रोड रोमियोंवर कारवाई

0
27

अडावद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महिला व मुलींच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत अडावद पोलिसांनी धानोरा परिसरात रोड रोमियो आणि टवाळखोरांविरोधात विशेष धडक मोहीम राबवली. सार्वजनिक ठिकाणी विनाकारण घिरट्या घालणे, संशयास्पद हालचाली करणे आणि शांतता भंग करणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाई करत पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परिसरातील महिला, विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांच्या तत्परतेचे स्वागत करण्यात येत आहे.

धानोरा परिसरात काही व्यक्तींकडून रोड रोमिओगिरी आणि टवाळखोरी होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अडावद पोलिसांनी अचानक विशेष गस्त, नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन राबवले. शाळा, महाविद्यालये तसेच गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात आले. या विशेष मोहिमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणी विनाकारण रेंगाळणारे, हुल्लडबाजी करणारे आणि संशयास्पद हालचाली करणारे तीन जण पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून भविष्यातही अशा प्रवृत्तींना कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

सदर कारवाई अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक शरीफ तडवी, पोलीस अंमलदार सचिन नागरे, जयदीप राजपूत, विशाल तायडे तसेच महिला पोलीस अंमलदार दिव्या मराठे यांनी सक्रिय सहभाग घेतला. विशेष पथकाने संपूर्ण परिसरात प्रभावी गस्त घालत संशयितांवर लक्ष केंद्रित केले. पोलिसांच्या या धडक कारवाईनंतर धानोरा परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेषतः शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या नियमित मोहिमा राबविण्याची मागणीही स्थानिकांकडून करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची ही मोहीम महत्त्वाची ठरत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.


Protected Content

Play sound