यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील अक्लूद येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी परिषद समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना आणि लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शाळा प्रशासनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पारदर्शक मतदान प्रक्रियेद्वारे विद्यार्थी परिषदेची निवड करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता दीपप्रज्वलनाने झाली. शाळेचे प्राचार्य सचिन बनसोडे, पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका सौ. मनिषा शृंगी आणि शालेय व्यवस्थापक रामदास कुळकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि संपूर्ण परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थी परिषद सदस्यांच्या पालकांची उपस्थिती होय. आपल्या पाल्याच्या नेतृत्वाच्या प्रवासाची सुरुवात प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्याने पालकांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध मार्चपास्ट सादर करत संघभावना, शिस्त आणि नेतृत्वगुणांचे प्रभावी प्रदर्शन केले. त्यानंतर प्राचार्य सचिन बनसोडे यांच्या हस्ते शाळेचा ध्वज फडकावण्यात आला. या प्रसंगी पालकांनी आपल्या पाल्यांना विद्यार्थी नेतृत्वाचे प्रतीक असलेले बॅज आणि शॅश परिधान करून त्यांचा गौरव केला. हा क्षण उपस्थितांसाठी भावनिक आणि अभिमानास्पद ठरला. विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची भावना आणि नेतृत्वाचे संस्कार रुजविण्याचा हा उपक्रम विशेष ठरल्याचे मत अनेक पालकांनी व्यक्त केले.
नवनिर्वाचित विद्यार्थी परिषदेमध्ये राजवर्धन पाटील यांची हेड बॉय तर भक्ती फेगडे यांची हेड गर्ल म्हणून निवड झाली. तसेच निरंजन पाटील, इरा अग्रवाल, अनिरुद्ध पाटील, आदित्य पवार, पूजा अग्रवाल, शताक्षी चौधरी, जीत पाटील, जाधव, पलक भंगाळे, श्रावणी जाधव, तोषल देशमुख, प्रणित सोनवणे, भार्गवी धगे, सान्वी सोनवणे, मृदुल बेंडाळे, तेजस्वी सोनजे, अथर्व राय, कनिका तेहलानी, पार्थ शिरसाठ, आयात तडवी, शिवांश परदेशी, इशिता कोटेचा, अर्णव काब्रा, रेणू चौधरी, सक्षम कासार, जान्हवी लद्धा, आरव चोरडिया, विधी ढाके, रिषिक पांगळे आणि सायंती पाटील यांनी नेतृत्वाची शपथ घेत आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प केला. प्राचार्य सचिन बनसोडे यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात विद्यार्थ्यांना उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याचे आवाहन केले. विद्यार्थी परिषद सदस्यांनी नेतृत्व करताना प्रामाणिकपणा, शिस्त, सेवाभाव आणि सहकार्य या मूल्यांचा अंगीकार करावा, असा संदेश त्यांनी दिला. तसेच नव्या पदाधिकाऱ्यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.



