
अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या दळणवळण व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी बोळे-मोंढाळे-फाफोरे-अमळनेर-मारवड-निम-कपिलेश्वर रस्ता (प्रजिमा-४९) सुधारणा प्रकल्पाला गती मिळाली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या सुधारणेच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप मिळत असून, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी धार ते मारवड आणि कळमसरे ते निम या दोन रस्त्यांच्या कामांचे माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या दोन्ही कामांसाठी एकूण ३ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी अपेक्षित असून, परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

बोळे-मोंढाळे-फाफोरे-अमळनेर-मारवड-निम-कपिलेश्वर या संपूर्ण मार्गाच्या सुधारणा कामासाठी अंदाजित ७ कोटी ७६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे १२ दिवसांपूर्वी अमळनेर ते धार या रस्त्याच्या अंदाजित १ कोटी ८८ लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. त्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर आता धार ते मारवड आणि कळमसरे ते निम या पुढील टप्प्यांतील कामांचे भूमिपूजन झाल्याने रस्ते विकास प्रकल्पाला अधिक गती मिळाली आहे. धार ते मारवड या रस्त्याच्या सुधारणा कामासाठी १ कोटी ८८ लाख रुपये, तर कळमसरे ते निम या रस्त्यासाठी १ कोटी ८८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही कामांचा शुभारंभ झाल्याने संबंधित गावांमधील दळणवळण अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. रस्त्यांची सुधारणा झाल्यानंतर वाहनधारक, शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रवासादरम्यान मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे.
धार, मारवड, कळमसरे, निम आणि परिसरातील गावांना जोडणारा हा मार्ग दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरून शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि विविध कामांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. तसेच कपिलेश्वर आणि निम येथील श्री अनिरुद्ध बापूंच्या तीर्थस्थळी अनेक भाविक नियमितपणे जात असतात. मात्र, रस्त्याची दुरवस्था आणि प्रवासादरम्यान निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या मार्गाचे दर्जेदार नूतनीकरण आणि सुधारणा व्हावी, अशी मागणी सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या कामांना सुरुवात होत असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था सुधारल्यास शेतीमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांचा प्रवास, दैनंदिन व्यवहार तसेच धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्याची सुविधा अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
भूमिपूजन कार्यक्रमाला जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनियुक्त संचालिका सौ. जयश्री अनिल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य व्ही. आर. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तसेच धार, मारवड, कळमसरे आणि निम येथील आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध सहकारी संस्थांचे चेअरमन, सोसायटी संचालक मंडळ आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या मार्गावरील मारवड ते कळमसरे या उर्वरित रस्त्याच्या सुधारणा कामासाठी अंदाजित २ कोटी १२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामालाही लवकरात लवकर मंजुरी देऊन गती मिळावी आणि त्याचा शुभारंभ करण्यात यावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी आमदार अनिल पाटील यांच्याकडे केली. संपूर्ण मार्गाची सुधारणा पूर्ण झाल्यास ग्रामीण भागाच्या दळणवळण व्यवस्थेला अधिक चालना मिळून विकासाच्या प्रक्रियेला बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



