
अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी सौ. जयश्री अनिल पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार उत्साहात आणि सन्मानपूर्वक करण्यात आला. अमळनेर तालुक्यातून सोसायटी मतदारसंघात प्रथमच महिला संचालक म्हणून मिळालेला हा बहुमान सहकार क्षेत्रातील महत्त्वपूर्ण घडामोड मानला जात असून, त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील सहकार चळवळीला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

सौ. जयश्री अनिल पाटील या माजी जिल्हा परिषद सदस्या असून, जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचा पहिला जाहीर नागरी सत्कार अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला. सहकार क्षेत्रातील ही निवड केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून अमळनेर तालुक्याच्या सहकार चळवळीचा सन्मान आणि शेतकरी बांधवांच्या अपेक्षांना नवी दिशा देणारा क्षण असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.
सत्कार सोहळ्याप्रसंगी शेतकी संघाचे अध्यक्ष संभाजी लोटनराव पाटील, उपाध्यक्ष गणेश धर्मराज भामरे, ज्येष्ठ संचालक विक्रांत भास्करराव पाटील, संजय पुनाजी पाटील, सचिन बाळू पाटील, सुभाष सुकलाल पाटील, सुरेश पिरन पाटील, श्याम साहेबराव पवार, प्रफुल्ल हिरालाल पवार, नितीन बापूराव पाटील, शंकर बंडू बैसाणे, रणजीत भीमसिंग पाटील, जितेंद्र दिनकर पाटील, संचालिका सौ. सुषमाताई वासुदेव देसले आणि सौ. मालुबाई बापूराव पाटील उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना सौ. जयश्रीताई पाटील यांनी शेतकी संघाच्या पदाधिकारी व संचालकांना सहकार क्षेत्राच्या विकासासाठी सकारात्मक सहकार्य करण्याची ग्वाही दिली. अमळनेर तालुका शेतकी संघाच्या माध्यमातून शासनाचे विविध नवनवीन उपक्रम, विकासात्मक प्रकल्प आणि शेतकरी हिताचे उपक्रम राबविताना आर्थिक सहाय्य अथवा अन्य मदतीची आवश्यकता भासल्यास सकारात्मक विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्जपुरवठा आणि इतर आवश्यक बाबींमध्ये शेतकी संघाच्या मागण्यांना प्राधान्याने न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी आश्वासन दिले.
जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. तिलोत्तमाताई पाटील यांनी अमळनेर तालुका सोसायटी मतदारसंघातून प्रथमच एका महिलेची बिनविरोध निवड झाल्याबद्दल जयश्रीताई पाटील यांचे अभिनंदन केले. त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देताना तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेवर आणि वाढीव कर्जपुरवठा उपलब्ध व्हावा, तसेच जिल्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शेतकी संघाचे माजी उपाध्यक्ष दीपक बागुल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षा सौ. मंदाकिनी पाटील, शहराध्यक्षा श्रीमती आशाताई चावरिया, रुग्णकल्याण समिती सदस्या सौ. अलका पवार, शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, खान्देश शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष जितेंद्र झाबक, माजी नगरसेवक मनोज पाटील, नगरसेवक राजू फाफोरेकर, नगरसेवक रामकृष्ण पाटील, कैलास पाटील (मुख्याध्यापक, लोण), गुणवंत पाटील (झाडी), निळकंठ पाटील आणि राहुल गोत्राळ यांच्यासह शेतकी संघाचे सभासद व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्येष्ठ संचालक संजय पुनाजी पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी व्यवस्थापक संजय पाटील आणि शेतकी संघाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



