अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील पातोंडा गावात अस्वच्छता, बंद सार्वजनिक पथदिवे, तुंबलेल्या गटारी, गळकी पाणीपुरवठा जलवाहिनी आणि अंगणवाड्यांची दयनीय अवस्था यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील विविध समस्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (सीईओ) प्रत्यक्ष गावाला भेट देऊन पाहणी करावी आणि तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायत कार्यालयाजवळील जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून तेथे दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बसस्थानक परिसर, नवीन पाण्याची टाकी, अंगणवाडी परिसर, जुने प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच मराठी शाळेमागील वस्तीमध्येही मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वारंवार तक्रारी करूनही कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गावातील अनेक गटारी तुंबलेल्या अवस्थेत असून त्यामधील साचलेले पाणी आणि काढलेली घाण दीर्घकाळ तशीच पडून राहत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. माहिजी देवी रोडलगतच्या मुख्य गटारी तसेच दलित वस्तीतील पेंडेमांग वस्ती परिसरात सांडपाणी तुंबल्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे स्थानिकांनी सांगितले.

गावातील प्लॉट परिसर, मराठी शाळा परिसर आणि इतर अनेक वस्त्यांमधील सार्वजनिक पथदिवे गेल्या महिनाभरापासून बंद असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारातून ये-जा करावी लागत असून सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पथदिवे सुरू करण्यासाठी अनेकदा ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
गटारींच्या अस्वच्छ अवस्थेमुळे गावात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून फॉगिंग मशीन उपलब्ध असूनही धूरफवारणी नियमित केली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय धूरफवारणीसाठी लेखी अर्ज मागितले जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित विषयांवर तातडीने निर्णय होण्याऐवजी प्रशासकीय विलंब होत असल्याची टीका ग्रामस्थांकडून केली जात आहे. पातोंडा गावाला तापी नदीकाठावरील नालखेडा येथून पाणीपुरवठा केला जातो. मात्र मुख्य जलवाहिनी गेल्या सहा महिन्यांपासून गळत असल्याचा आरोप असून त्यामुळे दूषित पाणीपुरवठ्याचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित शेतातून जाणारी जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
गावातील काही अंगणवाड्या गळक्या झाल्यामुळे लहान मुलांना सुरक्षित वातावरणात बसण्याची अडचण निर्माण झाली आहे. अंगणवाडी परिसरात कचरा आणि तुंबलेल्या गटारी असल्याने बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अनेक पालक मुलांना अंगणवाडीत पाठवण्यास टाळाटाळ करत असल्याने उपस्थितीवरही परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे. संपूर्ण गावासाठी केवळ एकच सफाई कर्मचारी कार्यरत असल्याने नियमित स्वच्छता करणे शक्य होत नसल्याचा मुद्दाही समोर आला आहे. तसेच काही वर्षांपूर्वी खरेदी करण्यात आलेली घंटागाडी नादुरुस्त असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय ग्रामपंचायत परिसरातील मांसविक्री दुकानांमधून सांडणारे पाणी आणि कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे.



