अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गेल्या चार-पाच दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अमळनेर शहराला मोठा फटका बसला असून, महापुराच्या परिस्थितीचा परिणाम थेट शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर झाला आहे. भर पावसाळ्यातच नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर यांनी तातडीची पत्रकार परिषद घेत नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
अतिवृष्टीमुळे अमळनेर शहरासह परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाले आणि जलस्रोतांवर परिणाम झाला असून, त्याचा फटका शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेलाही बसला आहे. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या असून नागरिकांना पाण्यासाठी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अतिवृष्टी आणि महापुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पाणीपुरवठा यंत्रणेवर अतिरिक्त ताण आला आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर यांनी केले.

पत्रकार परिषदेदरम्यान शहरातील पाणीपुरवठ्याच्या सद्यस्थितीचा तसेच निर्माण झालेल्या अडचणींचा आढावा घेण्यात आला. पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहितीही यावेळी देण्यात आली. नागरिकांची गैरसोय शक्य तितक्या लवकर दूर करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या पत्रकार परिषदेला मुख्याधिकारी गणेश शिंदे, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक अनिल महाजन, नावीद शेख तसेच पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सत्यम पाटील उपस्थित होते. प्रशासनातील संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे स्पष्ट केले.



