अमळनेर– लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ आणि अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य श्री महाश्रमण जी यांच्या पावन प्रेरणेने गुरुवारी, १७ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वाढत्या रक्ताच्या गरजेच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि समाजात दातृत्वाची भावना वाढीस लागावी, या उद्देशाने या सामाजिक उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर अमळनेर शहरातील तेरापंथ भवन (न्यू प्लॉट) तसेच प्रताप कॉलेज, इच्छादेवी चौक अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत हे रक्तदान शिबिर सुरू राहील. “रक्तदान… जीवनदान… आपका एक कदम, किसी के लिए नई उम्मीद” आणि “थेंब तुमचा जीवन त्यांचे – रक्तदान ही सर्वोत्तम सेवा… मानवतेचा खरा उत्सव” या सामाजिक संदेशांसह हे शिबिर पार पडणार आहे.

या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे समाजात वक्तशीरपणा आणि दातृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक रक्तदात्याला भेट म्हणून एक आकर्षक ट्रॉली बॅग दिली जाणार आहे. सुरक्षित रक्तदान आणि निरोगी समाजाची निर्मिती हीच खऱ्या अर्थाने मानवाची सेवा आहे, या संकल्पनेतून हा विशेष उपक्रम राबवला जात आहे. या महादानात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.



