


अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. परीक्षित बाविस्कर यांची कन्या कु. अरुश्री हिने रक्षाबंधनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी व शुभेच्छा पत्र पाठवले होते. या राखीची थेट दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष पत्राद्वारे अरुश्रीचे कौतुक करत तिचे आभार मानले आहेत. पंतप्रधानांच्या या पत्रामुळे बाविस्कर कुटुंबासह संपूर्ण अमळनेर शहरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकणाऱ्या कु. अरुश्री परीक्षित बाविस्कर हिने राष्ट्रनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनसेवा व राष्ट्रकल्याणासाठी उदंड, निरामय आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, या भावनेतून पवित्र रक्षासूत्राचा धागा नवी दिल्ली येथे पाठवला होता. अरुश्रीची राखी आणि पत्र नवी दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयाला प्राप्त झाल्यानंतर, स्वतः पंतप्रधानांनी तिचे कौतुक करणारे आणि प्रेरणादायी संदेश देणारे अधिकृत पत्र पाठवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, आज आपल्या देशातील मुली आणि विद्यार्थिनी विकसित भारताच्या उभारणीत मोलाचे योगदान देत आहेत. क्रीडा, कौशल्य, शिक्षण तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रांत मुली आपली चमक दाखवत असून, राष्ट्रकल्याणात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून आपल्या स्त्रीशक्तीचा परिचय देत आहेत. विकसित भारत निर्माण करण्यासाठी ‘शक्तीच्या सप्तधारा’ या संकल्पनेच्या माध्यमातून उत्पादन, कृषी, तंत्रज्ञान, नवे विचार, गतिशक्ती, रक्षण आणि सांस्कृतिक ऊर्जेला जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. अरुश्री आपल्या अभ्यासातून आणि भविष्यातील योगदानातून या बदलत्या भारताच्या प्रवासात नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.



