


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव येथील हनुमान मंदिर ते मानेगाव फाटा या महत्त्वपूर्ण रस्ता कामात गंभीर अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी मंजूर झालेला असताना, प्रत्यक्ष कामाच्या वेळी मात्र तांत्रिक निकषांना पूर्णपणे हरताळ फाळला जात असल्याचे दिसून येत आहे. अस्तित्वात असलेल्या जुन्या डांबरी रस्त्याचे खोदकाम किंवा आवश्यक प्रक्रिया न करता थेट त्यावरच काँक्रिटचा थर टाकला जात असल्याने मानेगाव येथील ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
शासनाचा सार्वजनिक निधी खर्च करून रस्त्याचे दर्जेदार काम होणे अपेक्षित असताना ठेकेदाराकडून अत्यंत बेजबाबदारपणे आणि नियमबाह्य पद्धतीने काम उरकले जात आहे. डांबरीकरणाचा जुना थर तसाच ठेवून त्यावर काँक्रिटीकरण केल्यास हा रस्ता किती दिवस टिकणार आणि पावसाळ्यात तो टिकून राहील का, असा थेट सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. भविष्यात हा रस्ता अवघ्या काही महिन्यांत उखडल्यास पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली शासनाचा निधी हडप केला जाण्याची भीती व्यक्त होत असून, संबंधित विभागाने या कामाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर, संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन मंजूर अंदाजपत्रक (DTP), तांत्रिक निकष आणि प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामाची सखोल पडताळणी करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जोपर्यंत तांत्रिक तपासणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे काम तात्काळ थांबवण्यात यावे आणि दोषी आढळणाऱ्या ठेकेदारावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.



