अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरात बंद घरांचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील दोन आरोपींना अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. अटक केलेल्या आरोपींकडून अमळनेर शहरातील तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, चोरीस गेलेले सोने-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू असा एकूण १ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकाला आरोपींबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने संशयितांचा शोध घेतला. या कारवाईत नवलसिंह वनसिंह अलावा (वय ३९, रा. काकडवा, ता. कुक्षी, जि. धार, मध्यप्रदेश) याला तांडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये आणून संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली. अटकेनंतर केलेल्या चौकशीत नवलसिंह अलावा याने आपला साथीदार केरु उर्फ केहरु इडीया डाबर (वय ४५, रा. बलेडी, गलबेडा फलिया, ता. जोबट, जि. अलीराजपूर, मध्यप्रदेश) याच्यासोबत अमळनेर शहरात तीन घरफोड्या केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू केला.

तपासात ३१ जानेवारी २०२६ रोजी अमळनेर शहरातील नदीजवळील कॉलनीत घरफोडी झाल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी शहराबाहेरील शेत परिसरात मोटारसायकल उभी करून मध्यरात्रीनंतर बंद घराचे कुलूप तोडले आणि घरातील सोने-चांदीचे दागिने चोरून नेल्याची माहिती चौकशीत समोर आली. या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.
त्यानंतर ३ एप्रिल २०२६ रोजी सिमेंट काँक्रीट रस्त्याजवळील कॉलनीतील एका बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करण्यात आला. घरातील सोने-चांदीचे दागिने चोरी करून नेल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिसरी घटना २४ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्रीनंतर घडली. सिमेंट काँक्रीट रस्त्याजवळील कॉलनीतील एका बंद घराचे कुलूप तोडून आरोपींनी घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातून ५०० रुपयांच्या ५० नोटा, अशी एकूण १० हजार रुपयांची रोकड, तसेच देवघरातील चांदीची गणपतीची मूर्ती आणि नक्षीकाम केलेले चांदीचे लक्ष्मीचे गोल नाणे चोरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पहिल्या आरोपीकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी दुसऱ्या आरोपीचा मध्यप्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील जोबट तालुक्यात शोध घेतला. त्यासाठी अमळनेर पोलिसांचे पथक मध्यप्रदेशात रवाना करण्यात आले. पथकाने केरु उर्फ केहरु इडीया डाबर याला बलेडी गावातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अमळनेर येथे आणून संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली. पोलिसांनी या तीन गुन्ह्यांशी संबंधित एकूण १ लाख ८० हजार रुपये किमतीचा सोने-चांदीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ९० ग्रॅम वजनाची चांदीची गणपतीची मूर्ती, २० ग्रॅम वजनाचे चांदीचे लक्ष्मीचे गोल नाणे, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची गोळी, ५० ग्रॅम वजनाचा चांदीचा तुकडा, चांदीच्या कड्या, सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे करदोडे आणि चांदीच्या वाळ्यांच्या जोडांचा समावेश आहे.
ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते आणि अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत अमळनेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, पोलीस नाईक सूर्यकांत साळुंखे, पोलीस कर्मचारी प्रशांत पाटील, उज्ज्वल पाटील, नितीन मनोरे, उज्ज्वलकुमार म्हस्के आणि नितीन कापडणे, तसेच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांनी सहभाग घेतला.



