Home Cities जळगाव सुधर्मा ज्ञान सभेच्यावतीने १५० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

सुधर्मा ज्ञान सभेच्यावतीने १५० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

0
17

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सुधर्मा ज्ञान सभेच्या वतीने १५० आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. महाबळ येथील अभियंता भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा प्रेरणादायी संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील जिद्द आणि स्वप्नांनी भारावून गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच्या जीवनप्रवासातूनही विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा सुधर्मा संस्थेचे हेमंत बेलसरे यांनी आंब्याचे रोप आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्रास्ताविकात हेमंत बेलसरे यांनी सांगितले की, गेल्या २४ वर्षांपासून सुधर्मा ज्ञान सभा जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी सातत्याने कार्यरत आहे. आजपर्यंत पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक उपक्रमांचा लाभ मिळाला असून सुमारे ३०० विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले आहे. याशिवाय फिरते संगणक प्रशिक्षण केंद्र, कीर्ती बाल वाचनालय यांसारखे नाविन्यपूर्ण उपक्रमही राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या भविष्यातील ध्येयाविषयी विचारणा केली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक, डॉक्टर, वकील, शास्त्रज्ञ, उद्योगपती, कलेक्टर अशा विविध क्षेत्रांत कार्य करण्याची स्वप्ने व्यक्त केली. कचरावेचक कुटुंबातील विद्यार्थिनी प्रतिभा बोरसे हिने वकील होण्याची इच्छा व्यक्त केली, तर समता नगर येथील रोशनी नन्नवरे हिने सुधर्माच्या मदतीने जळगावच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असल्याचे सांगत ध्येय गाठण्याविषयी मार्गदर्शन मागितले. मन्यारखेडा येथील एका विद्यार्थ्याने उद्योगपती बनून अनेकांना रोजगार देण्याचा निर्धार व्यक्त केला. विद्यार्थ्यांची स्वप्ने ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्वतःच्या आयुष्यातील प्रेरणादायी अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला. त्यांनी सांगितले की, ते स्वतः जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेले असून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना लंडनमध्ये उच्च वेतनाची नोकरी मिळाली होती. मात्र आपल्या ज्ञानाचा उपयोग देशातील नागरिकांसाठी व्हावा या भावनेतून त्यांनी ती नोकरी सोडून भारतात परत येत स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि जिल्हाधिकारी होण्याचे ध्येय साध्य केले. “कुठे जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नसते, मात्र आयुष्यात काय बनायचे हे निश्चितच आपल्या हातात असते. मोठी स्वप्ने पाहा, कठोर परिश्रम करा आणि देशसेवेचे ध्येय ठेवा,” असे प्रेरणादायी आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

या कार्यक्रमात सुधर्मा संस्थेच्या माध्यमातून दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या ११ विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मन्यारखेडा येथील उमेश पाटील याचा पाय फ्रॅक्चर असल्याने तो व्यासपीठावर येऊ शकत नव्हता. ही बाब लक्षात येताच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवत स्वतः व्यासपीठावरून खाली उतरून त्याच्याजवळ जाऊन त्याला सन्मानित केले. त्यांच्या या संवेदनशील कृतीला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. यावेळी बडवाणी येथील शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर साळुंखे यांचा विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून तर मकरंद हेमंत काळुंखे यांचा कोरोना काळात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अखंड सेवा दिल्याबद्दल जिल्हाधिकारींच्या हस्ते शाल, श्रीफळ, गीता आणि वृक्षरोप देऊन गौरव करण्यात आला. या सत्काराने कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली.

या उपक्रमासाठी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे डॉ. प्रवीण पुराणिक, सातपुडा ऑटोमोबाईलचे डी. डी. बच्छाव तसेच योगेश सोरमारे यांनी आर्थिक सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन सौ. सुनिता बेलसरे यांनी केले. अत्यंत व्यस्त शासकीय कामकाज आणि पालकमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यानही गरीब विद्यार्थ्यांसाठी वेळ दिल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे विशेष आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नितीन तायडे, राहुल सोनवणे, प्रियंका पवार, सुवर्णा मराठे, भाग्यश्री नन्नवरे, सूर्यकांत हिवरकर, नानाभाऊ चव्हाण, दिनकर बाविस्कर आणि भूषण सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound