
अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेरसह तीन तालुक्यांसाठी संजीवनी ठरण्याची अपेक्षा असलेल्या पाडळसरे धरण प्रकल्पाला तब्बल २८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, एवढी वर्षे उलटूनही धरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, २८ वर्षांपूर्वीच्या धरणाच्या भूमिपूजन समारंभाची जुनी पत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने हा प्रकल्प पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. ‘पुढारी मोठे झाले, पण धरण मात्र झाले नाही’ अशा शब्दांत नेटकऱ्यांकडून राजकीय नेत्यांवर टीका केली जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या भूमिपूजन समारंभाच्या पत्रिकेत पाडळसरे धरण प्रकल्पाच्या शुभारंभाचा उल्लेख आहे. या पत्रिकेनुसार, २८ नोव्हेंबर १९९८ रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. तत्कालीन पाटबंधारे मंत्री एकनाथराव खडसे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले होते. तसेच त्यावेळचे अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी आणि मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. तब्बल २८ वर्षांपूर्वी झालेल्या या भूमिपूजनाची पत्रिका आज समोर आल्याने धरणाच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
विशेष म्हणजे, भूमिपूजनाच्या वेळी या प्रकल्पामुळे अमळनेरसह परिसरातील तीन तालुक्यांचा पाणीप्रश्न कायमचा सुटेल, शेतीला सिंचनाची सुविधा मिळेल आणि संपूर्ण परिसर सुजलाम सुफलाम होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, २८ वर्षांचा कालावधी लोटूनही प्रकल्प पूर्ण न झाल्याने या आश्वासनांचे पुढे काय झाले, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. धरणाचे वय वाढत असताना राजकीय पुढाऱ्यांची कारकीर्दही विस्तारली; मात्र धरणाचे काम अपेक्षित टप्प्यावर पोहोचले नाही, अशी उपरोधिक चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे.
‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ या म्हणीचा प्रत्यय आज अमळनेर तालुक्यासह संपूर्ण खान्देशातील नागरिकांना येत असल्याची भावना व्यक्त होत आहे. पाडळसरे धरण पूर्ण झाल्यास परिसरातील शेतीला मोठा आधार मिळू शकतो. पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेतकऱ्यांना पावसावर अवलंबून राहण्याची वेळ कमी येईल आणि शेती उत्पादनातही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. मात्र, धरणाचे काम रखडल्याने या भागातील शेतकऱ्यांना आजही पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
या प्रकल्पाचे काम भूमिपूजनानंतर अवघ्या १४ वर्षांत पूर्ण झाले असते, तर आज जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांचे चित्र वेगळे दिसले असते. शेतीला मुबलक पाणी मिळून अनेक गावांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळाली असती. मात्र, तीन दशकांच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या या प्रकल्पाची प्रतीक्षा अद्याप संपलेली नसल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे.
एकीकडे पाडळसरे धरणाच्या भूमिपूजनाची जुनी पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तर दुसरीकडे शेतकरी दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या संकटाशी झुंज देत आहेत. त्यामुळे धरणाच्या कामाला झालेला विलंब, आतापर्यंत झालेला खर्च, उर्वरित काम आणि प्रकल्प पूर्ण होण्याची निश्चित कालमर्यादा याबाबत पारदर्शक माहिती जाहीर करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. नेटकऱ्यांकडून होणाऱ्या टीकेमुळे राजकीय नेत्यांनाही या प्रश्नावर उत्तर द्यावे लागणार असल्याची चर्चा आहे.
पाडळसरे धरण हा केवळ विकासकामाचा विषय नसून हजारो शेतकरी, नागरिक आणि आगामी पिढ्यांच्या पाण्याच्या भविष्याशी जोडलेला महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे आता तरी राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने राजकीय आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवून धरणाच्या कामाला गती द्यावी, निधी व तांत्रिक अडचणी दूर करून प्रकल्प पूर्णत्वास न्यावा, अशी मागणी अमळनेरसह संपूर्ण खान्देशातून होत आहे.



