मुख्यमंत्री ‘कारशेड’चा नियम ‘स्मारका’ला लावणार का ? : पर्यावरणप्रेमींचा सवाल

udhdhav thakaray

मुंबई, वृत्तसंस्था | ‘आरे’मधील मेट्रोच्या कारशेडसाठी तोडण्यात आलेल्या झाडांना शिवसेनेने मोठा विरोध केला. त्या पार्श्वभूमीवर आता औरंगाबादमध्ये होणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी तब्बल पाच हजार झाडांची कत्तल केली जाणार आहे. प्रियदर्शनी उद्यान परिसरातील झाडे कापली जात असताना मात्र शिवसेनेकडून मौन बाळगण्यात आले आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. आरेमधील झाडांच्या कत्तलीला शिवसेनेने विरोध केला असतानाच तोच नियम औरंगाबादमधील प्रियदर्शनी उद्यानाला लावणार का ? असा सवाल आता पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येत आहे.

 

प्रियदर्शनी उद्यानात ७० पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी, ४० प्रकारची फुलपाखरे आणि अन्य जीव आढळतात. या उद्यानाची जागा यापूर्वी सिडकोच्या ताब्यात होती. परंतु कालांतराने ती मनपाच्या ताब्यात देण्यात आली. त्यानंतर या उद्यानातील ४४३ झाडे तोडण्यात आली आहेत. याच ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.

या उद्यानात हे स्मारक उभारायचे असल्यास त्यासाठी पाच हजार झाडांची कत्तल करावी लागणार असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे. तसंच या विरोधात ‘ग्रीन औरंगाबाद फोरम’च्या माध्यमातूनही आंदोलन उभारण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एकूण ६४ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यात स्मारक उभारण्यासाठी १ हजार १३५ चौरस मीटर, फुड पार्कसाठी २ हजार २२० मीटर, म्युझिअमसाठी २ हजार ६०० चौरस मीटर तर ३ हजार ६९० चौरस मीटर उघडी जागा असणार आहे. आता यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार ? असा सवाल सर्व स्तरातून करण्यात येत आहे.

Protected Content