महाराष्ट्र ‘अंनिस’ अध्यक्षपदी प्रा. एन. डी. पाटील

 

पुणे (वृत्तसंस्था) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांची निवड करण्यात आली आहे. भोर, जि पुणे येथे झालेल्या त्रैवार्षिक राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.दरम्यान, प्रा.पाटील (कोल्हापूर) हे समितीच्या स्थापनेपासून अध्यक्ष आहेत.

 

शहिद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या कुशल व कल्पक नेतृत्वात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाने संघटीत कामास १९८९ साली सुरूवात झाली होती. सध्या संघटनेचे त्रिदशकपूर्ती वर्ष सुरु आहे. संघटनेमध्ये राज्य अध्यक्ष व उपाध्यक्ष ही सन्माननीय पदे आहेत. महाराष्ट्राच्या राजकिय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात जवळपास ६५ वर्षे अत्यंत कृतीशीलपणे कार्यरत असलेले आणि नैतिक प्रभाव असलेले भाई एन् डी पाटील सर हे महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री राहीलेले आहेत. कर्मवीर भाऊराव पाटीलांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या रयत शिक्षण संस्थेचे ते माजी अध्यक्ष व विश्वस्त असून शेतकरी कामगार पक्षाचे दोन दशके राज्य सचिव राहिले आहेत.

यासोबतच महाराष्ट्र अंनिसच्या राज्य उपाध्यक्षपदी समाजातील अशाच सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतीक, व्यावसायिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना विनंती करुन निवड केली जाते. ही निवड करतांना विविध महसुल विभागातुन समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो. या त्रैवार्षिक काळासाठी निवड करण्यात आलेल्या उपाध्यक्षांमध्ये महाराष्ट्रातील जेष्ठ लेखक, संपादक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष विचारवंत उत्तम कांबळे (नाशिक), डॉ पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेचे माजी जेष्ठ उपाध्यक्ष व सत्यशोधकी कार्यकर्ते महादेवराव भुईभार (अकोला), राजारामबापु सहकारी बँकेचे चेअरमन व पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक, राजकिय क्षेत्रातील एक सन्माननीय व्यक्तीमत्व प्रा शामराव पाटील (इस्लामपूर), स्वामी रामानंद तीर्थ यांनी सुरू केलेल्या अंबेजोगाई येथील जोगेश्वरी शिक्षण संस्था या मराठवाड्यातील नामांकित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व नांदेड येथील वैद्यकिय क्षेत्रातील एक ख्यातनाम व्यक्तीमत्व डॉ सुरेश खुरसाळे यांचा समावेश आहे.

महा अंनिस संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष हे प्रत्यक्ष कामातील सर्वोच्च पद आहे. या पदी अविनाश पाटील (धुळे) यांची चौथ्यांदा पुनर्निवड झाली आहे. शहीद डॉ नरेंद्र दाभोळकरांनी सन २०१०-११ सालीच या संघटनेचे नेतृत्व अविनाश पाटील या तरुण कार्यकर्त्यांकडे हस्तांतरीत केले होते. अविनाश पाटील संघटनेसाठी सातत्याने महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर देश पातळीवर संघटना वाढीसाठी भ्रमंती करीत असतात. त्यांनी समर्थपणे नेतृत्व करुन डॉक्टरांच्या खुनानंतर संघटना एकसंध ठेवून वर्धिष्णू ठेवली आहे. भारतातील सर्व विवेकवादी संघटनांचे समन्वय मंच असलेल्या फिरा *(फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनल असोसिएशन) याचे अविनाश पाटील हे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.
राज्य प्रधान सचिव म्हणुन माधव बावगे (लातूर), सुशिला मुंडे (डोंबिवली), गजेंद्र सुरकार (वर्धा), संजय बनसोडे (इस्लामपूर), नंदकिशोर तळाशिलकर (मुंबई), प्रशांत पोतदार (सातारा) व मिलिंद देशमूख (पुणे) यांची निवड झाली आहे. त्याचसोबत महाराष्ट्रातील महसूल विभागनिहाय प्रत्येकी दोन असे एकूण दहा सरचिटणीस आणि प्रत्यक्ष कामाच्या स्वरुपानुसार असलेल्या विविध राज्य विभागांसाठी कार्यवाह व सहकार्यवाह यांच्यासह समितीचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या मासिकाचे, थॉट अॅण्ड अॅक्शन या इंग्रजी त्रैमासिकाचे संपादक मंडळ देखील निवडण्यात आले आहे.

 

या निवड प्रक्रीयेसाठी संघटनेतील कार्यकर्त्यांपैकी इच्छूकांकडुन अर्ज मागविले जातात. संघटनेतील जेष्ठ कार्यकर्त्यांची निवड सहमती समिती योग्य त्या निकषांवर निवड करते. या निवड समिती प्रा .डॉ. एन् .डी .पाटील सरांच्या अध्यक्षतेत कुमार मंडपे, मच्छिंद्रनाथ मुंडे, शालीनीताई ओक आणि माधव बावगे यांच्या सहभागाने गठीत करण्यात आली होती.

Protected Content