पुण्यात मद्यपी चालकाने पुन्हा बेदरकारपणे पळवली बस

1 2

पुणे, वृत्तसंस्था | पुण्यात काही वर्षांपूर्वी संतोष माने नावाच्या एसटी चालकाने बेदरकार बस चालवून ९ बळी घेतले होते. या थरकाप उडवणाऱ्या घटनेची पुनरावृत्ती काल (दि.२४) सुदैवाने टळली आहे. मद्यपान करून आलेल्या चालकामुळे शिवशाही बसमधून प्रवास करणाऱ्या २७ प्रवाशांचे जीव बुधवारी रात्री टांगणीला लागले होते.

 

चालकाने नशेत गाडी चालवून बस भिंतीला धडकवली. पुण्याहून उस्मानाबादला जाणाऱ्या शिवशाही बसमध्ये काल रात्री ९.३० ते १०.०० च्या सुमारास हा प्रकार घडला. विशेष म्हणजे बसचे चालक, वाहक बसमधून उतरलेले असताना हा एसटीचाच अन्य मद्यपी चालक या बसमध्ये चढला आणि त्याने बस चालवली. पुण्यात सिमला ऑफिस चौकात या चालकाने बस भिंतीला धडकवली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

या बसचा चालक गाडी सुरू ठेवून खाली उतरला होता. तसेच कंडक्टरही बसमध्ये नव्हता. त्या दरम्यान अन्य एक चालक या बसमध्ये चढला आणि त्याने ड्रायव्हर सीटवर ताबा मिळवला. गाडी सुरू करून शिवाजीनगर एसटी स्थानकातून तो बाहेरही पडला. मात्र, हा चालक वेगळाच असल्याचे प्रवाशांनी ओळखले तसेच मद्यपान केल्यामुळे तो गाडी देखील सुरक्षितपणे चालवत नव्हता. त्यामुळे प्रवाशांनी आरडाओरडा करून त्याला बस थांबवण्यास भाग पाडले. ही बस साधारण सिमला ऑफिस समोरील चौकापर्यंत पोहोचली होती. त्यावेळी संबंधित चालक बसमधून खाली उतरून पळण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याच पकडण्यात आले. गाडी पळवून नेणारा चालक हा एसटीचाच असून त्याने मद्यप्राशन केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे.

Protected Content