खडसेंचा ‘नेम’ आणि जुगार अड्डयावरील छाप्यात त्यांचाच समर्थकाचा ‘गेम’ !

मुक्ताईनगर Muktainagar -पंकज कपले (एक्सक्लुझीव्ह स्पेशल रिपोर्ट ) | माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे Eknath Khadse यांनी विधानपरिषदेत जिल्ह्यातील व त्यातही मुक्ताईनगर मतदारसंघातील अवैध धंद्यांबाबत घणाघाती हल्लाबोल केल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. यात रावेर तालुक्यात त्यांचाच समर्थक जुगार अड्डयावरील कारवाईत अडकल्याने हा योगायोग चर्चेचा विषय बनला आहे.

जळगाव जिल्ह्यातील अवैध धंदे हा खर तर अगदी चावून चोथा झालेला विषय होय. सर्वपक्षीय नेत्यांची दुसर्‍या आणि तिसर्‍या फळीतील मंडळी ही अगदी वाळूसारख्या सोन्याच्या खाणीसमान असणार्‍या धंद्यापासून ते सट्टा, पत्ता, अंमली पदार्थ, दारू, गुटखा, जुगाराचे अड्डे आदींमध्ये यथेच्छ हात धुवून घेत असल्याचे कुणीही नाकारणार नाही. आमदार एकनाथराव खडसे यांनी मात्र हा विषय नेटाने लाऊन धरला आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी मुक्ताईनगरातील अवैध धंद्यांवरील जबरदस्त टिका करतांना हप्त्यांचे रेटकार्डच जाहीर केले होते. हा व्हिडीओ आपण खाली पाहू शकतात.

पहा : नाथाभाऊंनी हिवाळी अधिवेशनात केली घणाघाती टिका

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/657508322835132

दरम्यान, जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही. या पार्श्‍वभूमिवर अलीकडेच सुरू झालेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जळगाव जिल्ह्यातील अवैध मुद्दे हा विषय खूपच गाजला. आमदार एकनाथराव खडसे यांनी पुन्हा या संदर्भात लक्षवेधी उपस्थित करतांना अक्षरश: सरकारवर घणाघाती टिका केली. जिल्ह्यात आणि त्यातही मुक्ताईनगर मतदारसंघात अवैध धंदे बोकाळले असून याला राजकीय संरक्षण असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. मुक्ताईनगरत कुणी पोलीस अधिकारी टिकत नसून जे आहेत ते रग्गड पैसा कमावत असल्याचा आरोप त्यांनी केला. आपण या संदर्भातील व्हिडीओ खाली पाहू शकतात.

पहा : अवैध धंद्यांच्या हप्त्यांबाबत नाथाभाऊंची विधीमंडळातील लक्षवेधी !

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/602508091909935

आमदार एकनाथराव खडसे यांचा सरळ रोख हा त्यांचे प्रतिस्पर्धी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे होता. पाटील यांच्या समर्थकांचे दोन नंबरचे धंदे असल्याचे जाहीर आरोप त्यांनी आधीच केलेले आहेत. यानंतर त्यांनी विधानपरिषदेतील लक्षवेधीच्या माध्यमातून हाच मुद्दा पुन्हा उपस्थित केला. मध्यप्रदेशला लागून असणार्‍या मुक्ताईनगरात अवैध गुटखा तसेच गांजा, अफीम आदी अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा आरोप करतांना स्थानिक पोलिसांसह त्यांनी थेट एसपी आणि डीआयजी यांच्यावरही आरोप केले. तर नंबर दोनच्या हप्त्याची रक्कम ही वरपर्यंत जात असल्याचा स्पष्ट आरोपही त्यांनी केला.

आमदार खडसे यांनी लक्षवेधी उपस्थित करून काही तास उलटत नाही तोच मुक्ताईनगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गुटख्याची पीकअप गाडी छापा मारून जप्त करण्यात आली. यात तब्बल २५ लाख रूपयांच्या गुटख्याला जप्त करण्यात आल्याने एकनाथराव खडसे यांच्या आरोपांना पुष्टी मिळाली. याबाबतची बातमी आपण येथे क्लिक करून वाचू शकतात.

दरम्यान, आमदार एकनाथराव खडसे यांनी केलेल्या आरोपांना ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी शनिवारी उत्तर दिले. ते म्हणाले की खडसे यांनी केलेल्या आरोपानंतर जिल्हा पोलिसांनी कारवाई करत गुटखा जप्त केला. मात्र हा गुटखा त्यांच्याच समर्थकांचा असल्याने नाथाभाऊंनी पोलिसांना कॉल करून आपल्याच कार्यकर्त्यांवर कारवाई का करतात ? असा प्रश्‍न उपस्थित करत धमकावल्याचा आरोप ना. गिरीश महाजन यांनी केला. एवढेच नव्हे तर एकीकडे लक्षवेधी उपस्थित करणारे खडसे हे दुसरीकडे पोलिसांना धमकावतात हा त्यांचा दुटप्पीपणा असून त्यांचे पितळ आता उघडे पडल्याची टिका गिरीश महाजन यांनी केली.

पहा : एकीकडे लक्षवेधी तर दुसरीकडे पोलिसांना धमक्या-गिरीशभाऊंची टिका

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/197435199640934

हा सर्व आरोप-प्रत्यारोपांचा कुटाणा सुरू असतांना सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास एलसीबीच्या पथकाने रावेर तालुक्यातील मोरगाव येथील जुगार अड्डयावर छापा टाकला. यात १६ जुगार्‍यांवर कारवाई करण्यात आली. आता यात नवीन काय ? असे कुणीही विचारू शकतो. खरं तर, मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्नाड फाटा आणि परिसरात अनेक जुगार अड्डे आहेत. येथे आजवर अनेकदा कारवाया करण्यात आल्या आहेत. कितीही मोठी कारवाई झाल्यानंतर काही दिवस झाले की पुन्हा राजरोसपणे सगळे काही सुरू होते. मात्र या कारवाईत संदीप दिनकरराव देशमुख यांना देखील अटक करण्यात आली. ते जुगार अड्डयाचे मालक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

संदीप दिनकराव देशमुख हे मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्नाड येथील रहिवासी असून ते एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक आहेत. भारतीय जनता पक्षात असल्यापासून ते नाथाभाऊंच्या सोबत असून त्यांनी यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. ‘नाथाभाऊ एके नाथाभाऊ’ अशी त्यांची राजकीय वाटचाल आहे. नाथाभाऊंचे अतिशय जवळचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळे एकीकडे विधानपरिषदेतील लक्षवेधी, यानंतर गुटख्याची जप्त करण्यात आलेली गाडी आणि आज पहाटे जुगार अड्डयावरील धाड या बाबींमधील योगायोग हा नक्कीच विचार करण्यासारखा आहे.

मुक्ताईनगरातील राजकीय लढाई ही अनेक मैदानांवर एकाच वेळेस सुरू आहे. यातील राजकीय मैदानातला मुकाबला अजून सुरूच असतांना आता नंबर दोनच्या मैदानावर देखील दोन्ही बाजूंची अदृश्य लढाई सुरू तर झाली नाही ना ? असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. नाथाभाऊंनी अवैध धंद्यांच्या माध्यमातून पोलिसांनह राजकीय विरोधकांवर अचूक ‘नेम’ धरला. तर समोरच्या बाजूने त्यांच्या खंद्या समर्थकाचाच ‘गेम’ करण्यात आला हे नाकारता येणार नाही. विधानपरिषदेत तळमळीने दोन नंबरच्या धंद्यांवर बोलणारे नाथाभाऊ आणि नंतर घडलेल्या घटनांचे तार हे एकमेकांशी अशा प्रकार गुंफले आहेत की, कुणीही थक्क व्हावे ! आता यावर दोन्ही बाजूंनी नेमक्या काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार हे देखील तितकेच खरे ! सर्वात महत्वाचे म्हणजे नाथाभाऊ हे देखील कसलेले खेळाडू असल्याने ते यावर काय तोडगा शोधणार ? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहेच…

Protected Content