भुसावळच्या माजी नगराध्यक्षांसह नगरसेवकांना दिलासा : निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा

भुसावळ Bhusawal-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांच्या अपात्रतेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केलेले तत्कालीन नगराध्यक्ष तसेच नऊ नगरसेवकांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यासाठी अपात्र घोषीत करण्याच्या निर्णयावर नगरविकास खात्याने शिक्कामोर्तब केले आहे.

याबाबत वृत्त असे की, २०१६ साली झालेल्या निवडणुकीत भाजपच्या कमळ या चिन्हावर रमण देवीदास भोळे हे लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवडून आले होते. त्यांच्यासोबत भाजपचे २५ नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यांची मुदत पुर्ण होण्यासाठी काही दिवस बाकी असतांना १७ डिसेंबर २०२१ रोजी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यामुळे त्यांना अपात्र करण्यात यावे यासाठी पुष्पा बत्रा यांनी जिल्हाधिकारर्‍यांकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन जिल्हाधिकार्‍यांनी १८ जुलै २०२२ रोजी निर्णय दिला होता.

या निकालात जिल्हाधिकार्‍यांनी तत्कालीन नगराध्यक्ष रमण देविदास भोळे यांच्यासह नगरसेवक बोधराज दगडू चौधरी, अमोल मनोहर इंगळे, प्रमोद नेमाडे, लक्ष्मी रमेश मकासरे, शोभा अरूण नेमाडे, मेघा देवेंद्र वाणी, किरण भागवत कोलते, शैलजा पुरूषोत्तम नारखेडे आणि सविता रमेश मकासरे यांना अपात्र करण्यात आले होते.

यानंतर, हा दहाही मान्यवरांनी नगरविकास खात्याकडे दाद मागितली होती. यावर दोन्ही बाजूंची सुनावणी झाल्यानंतर नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी यांनी या सर्वांचे अपील फेटाळून लावत जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय कायम ठेवला होता. या निर्णयाच्या विरोधात या सर्व जणांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली होती.

या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन याचा निकाल लागला. यात न्यायमूर्ती अरूण पेंढारकर यांनी या सर्व जणांना अपात्र करण्याच्या नगरविकास खात्याच्या निर्णयाला रद्द करत त्यांना निवडणुकीसाठी पात्र ठरविले आहे. परिणामी, तत्कालीन नगराध्यक्ष रमण देविदास भोळे यांच्यासह नगरसेवक बोधराज दगडू चौधरी, अमोल मनोहर इंगळे, प्रमोद नेमाडे, लक्ष्मी रमेश मकासरे, शोभा अरूण नेमाडे, मेघा देवेंद्र वाणी, किरण भागवत कोलते, शैलजा पुरूषोत्तम नारखेडे आणि सविता रमेश मकासरे यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content