Home Uncategorized महावितरणचे कर्मचारी किशोर सपकाळे यांचा दुहेरी गौरव

महावितरणचे कर्मचारी किशोर सपकाळे यांचा दुहेरी गौरव

0
6


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील फेकरी येथील महावितरणचे कर्मचारी किशोर भगवान सपकाळे यांचा नुकताच दुहेरी सन्मान करण्यात आल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अखिल भारतीय विद्युत क्रीडा स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरी आणि सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना मिळालेल्या दोन प्रतिष्ठित गौरवांमुळे त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अखिल भारतीय विद्युत क्रीडा स्पर्धेच्या 47 व्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरण संघाने विविध खेळांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत बास्केटबॉल खेळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल फेकरी येथील तथा शिंदी कक्षातील वरिष्ठ तंत्रज्ञ किशोर भगवान सपकाळे यांचा दिनांक 1 जून 2026 रोजी विशेष सत्कार करण्यात आला. महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी डी. डी. महाजन यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला. यावेळी शिंदी कक्षाचे अभियंता आखरे, दीपक पाटील, मानव संसाधन विभागाचे कुणाल खोंडे, बिलिंग विभागाचे पदाधिकारी तसेच संघटनेचे पदाधिकारी रविंद्र गायकवाड, मुकेश कोल्हे आणि महावितरणचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याशिवाय प्रादेशिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य (RTO), दापोली यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षण भूषण पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य आदर्श रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यातही किशोर सपकाळे यांना विशेष सन्मान प्राप्त झाला. जळगाव येथील अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमात त्यांना “महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षण पुरस्कार” प्रदान करून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.

समाजहितासाठी सातत्याने राबविण्यात येणारे सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रम, विविध क्षेत्रातील सक्रिय सहभाग तसेच समाजोपयोगी कार्याची राज्यस्तरावर दखल घेत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे अनेक सामाजिक उपक्रमांना चालना मिळाली असून युवकांमध्येही सकारात्मक प्रेरणा निर्माण झाली आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य आमदार सत्यजीत तांबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार किशोर दराडे, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन, रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशीद, राज्य सल्लागार प्रदीप सोनवणे, युवा सेना विभागीय सचिव विराज कावडिया यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

किशोर सपकाळे यांच्या या दुहेरी सन्मानामुळे फेकरी गावासह संपूर्ण भुसावळ तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्या यशाबद्दल विविध सामाजिक संस्था, सहकारी कर्मचारी, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound