
भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत मोठी कामगिरी केली आहे. या प्रकरणात नागपुरातून तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे १६ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादी घर बंद करून बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा माग काढण्यात आला.
तपासादरम्यान आरोपी राजू जसपालसिंग (रा. हरियाणा), भोला उर्फ बिंद्र सुखदेव पासवान (रा. बिहार) आणि राजेश पारस शाह (रा. बिहार) हे नागपूर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर पोलिसांच्या मदतीने तिघांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपींनी घरफोडीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १६.३४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व त्यांच्या पथकाने केली.



