भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या सेवा संपर्क अभियानांतर्गत भुसावळ येथील वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित कार्यक्रमात ४९ ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. तहसीलदार नीता लबडे आणि भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक दीपाली जगताप यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी सायबर गुन्हेगारीपासून सावध राहावे, कोणालाही गोपनीय माहिती देऊ नये आणि आर्थिक व्यवहार करताना विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले.
ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान संचलित वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा भुसावळ येथील रिंग रोड परिसरात आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून तहसीलदार नीताताई लबडे आणि भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक दीपाली जगताप उपस्थित होत्या. तसेच प्रकाश पाटील आणि सतीश जंगले यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात विश्वप्रार्थना आणि हनुमान चालीसा पठणाने करण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या सेवा संपर्क अभियानाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शासकीय सुविधांची माहिती पोहोचविणे आणि त्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ४९ ज्येष्ठ नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते ओळखपत्रे देण्यात आली. शासकीय ओळखपत्र मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
पोलीस निरीक्षक दीपाली जगताप यांनी ज्येष्ठ नागरिकांना वाढत्या सायबर गुन्हेगारीविषयी मार्गदर्शन केले. सायबर भामटे विविध क्लृप्त्या वापरून नागरिकांची आर्थिक फसवणूक करतात. बँकेचे अधिकारी, शासकीय कर्मचारी किंवा इतर विश्वासार्ह व्यक्ती असल्याचे भासवून ते वैयक्तिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनोळखी व्यक्तींच्या फोनवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही परिस्थितीत ओटीपी, आधार क्रमांक, बँक खात्याचा तपशील किंवा अन्य गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
ऑनलाइन व्यवहार करताना विशेष काळजी घेणे आवश्यक असून, अनोळखी लिंकवर क्लिक करणे, संशयास्पद संदेशांना प्रतिसाद देणे किंवा फोनवरून सांगितलेल्या सूचनांनुसार आर्थिक व्यवहार करणे टाळावे, असेही पोलीस निरीक्षक दीपाली जगताप यांनी सांगितले. फसवणुकीचा संशय आल्यास तातडीने संबंधित बँक आणि पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी तहसीलदार नीताताई लबडे यांनी ज्येष्ठ नागरिकांना सकारात्मक दृष्टिकोनातून जीवन जगण्याचा संदेश दिला. वयाची साठी ओलांडल्यानंतर स्वतःला वृद्ध समजण्याऐवजी अनुभवाने समृद्ध ज्येष्ठ नागरिक म्हणून स्वतःकडे पाहावे, असे त्यांनी सांगितले. आयुष्यातील अनुभव ही मोठी संपत्ती असून, त्याचा उपयोग स्वतःच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी करता येतो, असेही त्यांनी नमूद केले.
आपले आरोग्य आपल्या हातात असून, प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. नियमित दिनचर्या, आरोग्याबाबत जागरूकता आणि सकारात्मक विचार यांमुळे जीवन अधिक आनंदी होऊ शकते. शक्य तितके स्वावलंबी राहून इतरांवरील अवलंबित्व कमी करावे. तसेच जीवनात मिळालेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञतेची भावना ठेवणे आनंदी जीवनासाठी महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन नीता लबडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. जी. पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन सतीश जंगले यांनी केले.



