मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने संशयास्पद रीतीने फिरणाऱ्या आंध्र प्रदेशातील आंतरराज्यीय टोळीच्या तीन सदस्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल, जिवंत काडतूस, मोटारसायकल, मोबाईल आणि घरफोडीचे साहित्य असा एकूण २ लाख ४७ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १५:३० वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दोन मोटारसायकलींवरून पाच अनोळखी इसम संशयास्पद रीतीने फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्री. आशिष आडसूळ यांनी पोलीस ठाण्याच्या पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

पोलीस पथकाने एस. एस. कॉलेज परिसरात धाड टाकून संशयितांना थांबण्याचा इशारा केला असता, त्यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून मेकला प्रसन्नाकुमार मेकला दास (रा. करपल्ला थिपा, बोगले धामा वरम, जि. नेल्लूर, आंध्र प्रदेश), धरसिंगी देरध घोडीडी उर्फ प्रसिंग प्रसाद गुट्टेड्डी (रा. बिटुरगुंडा, जि. नेल्लूर, आंध्र प्रदेश) आणि मेकल विरास्वामी कोंडाया (रा. बिटुरगुंडा, जि. नेल्लूर, आंध्र प्रदेश) या तिघांना ताब्यात घेतले, तर त्यांचे दोन साथीदार मोटारसायकल सोडून पसार होण्यात यशस्वी झाले.
आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून २५ हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तुल व जिवंत काडतूस, ४५ हजार रुपयांचे तीन अँड्रॉइड मोबाईल, १ लाख ७० हजार रुपयांच्या दोन मोटारसायकली, ५ हजार ३०० रुपये रोख रक्कम, १०५ लोखंडी छर्रे, एक स्क्रू ड्रायव्हर, कापडी टोप्या, टी-आकाराचे टोकदार हत्यार आणि वेगवेगळ्या क्रमांकांच्या १० नंबर प्लेट्स जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४१२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता व शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी इतर ठिकाणीही घरफोडी आणि दरोड्यासारखे गंभीर गुन्हे केले असण्याची शक्यता असून, पोलीस पसार झालेल्या दोन आरोपींचा शोध घेत आहेत.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदरराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वात पोहेकॉ कल्पेश आमोदकर, असिम तडवी, पो.अं. रविंद्र धनगर, मुकेश महाजन, रितेश चव्हाण, आणि गोविंदा पवार यांनी केलेली असून सदर प्रकरणाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक संजय बनसोड हे करीत आहेत.



