Home क्राईम अवैध वाळू वाहतुकीवर जळगाव पोलिसांचा मोठा प्रहार! ५ गुन्हे दाखल, ७ आरोपींवर...

अवैध वाळू वाहतुकीवर जळगाव पोलिसांचा मोठा प्रहार! ५ गुन्हे दाखल, ७ आरोपींवर कारवाई ; ५०.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

0
4

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरुद्ध जिल्हा पोलीस दलाने धडक मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. भडगाव, नशिराबाद आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्यांच्या पथकांनी विविध ठिकाणी छापे टाकून अवैध वाळू वाहतुकीचे एकूण पाच गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत सात आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून तीन डंपर, दोन ट्रॅक्टर आणि वाळूसह एकूण ५० लाख ९० हजार २६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ४ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारी अधिकाऱ्यांना विशेष पथके तयार करण्याचे निर्देश दिले होते. अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते.

या निर्देशानुसार भडगाव, नशिराबाद आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी आपल्या अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती संकलित करून अवैध वाळू वाहतुकीविरोधात प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी विविध ठिकाणी पथके तैनात करून कारवाई करण्यात आली. भडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वलवाडी बुद्रुक, ता. भडगाव येथे अवैध वाळू वाहतुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत दोन आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली असून १२ ब्रास वाळू आणि दोन डंपर असा एकूण ४१ लाख ३१ हजार ५६६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संपूर्ण कारवाईतील ही सर्वाधिक किमतीची जप्ती ठरली आहे. नशिराबाद पोलीस ठाण्याच्या पथकाने तरसोद फाट्याजवळील महामार्ग पुलावर कारवाई केली. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक २९४/२०२६ दाखल करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तीन ब्रास वाळू आणि एक डंपर असा एकूण तीन लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने फुफनगरी गाव परिसरातील नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीविरोधात सलग तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. खेडी खुर्द गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सार्वजनिक जागेत करण्यात आलेल्या कारवाईत गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५०/२०२६ अंतर्गत एका आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आली. यात एक ब्रास वाळू आणि एक ट्रॅक्टर असा दोन लाख २४ हजार २३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याच परिसरात दाखल करण्यात आलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५१/२०२६ मध्ये तीन ते चार घमेले वाळू आणि एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून या मुद्देमालाची किंमत दोन लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात एका आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच फुफनगरी गावाच्या नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीप्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत एक ब्रास वाळू आणि एक ट्रॅक्टर असा दोन लाख २४ हजार २३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्व कारवायांमध्ये  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भडगाव, नशिराबाद आणि जळगाव तालुका या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण पाच गुन्हे दाखल करून सात आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत (जळगाव परिमंडळ), अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव परिमंडळ), उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे (जळगाव विभाग) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड (चाळीसगाव विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश टाक आणि सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्यासह त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


Protected Content

Play sound