जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जमीन हक्क, वनहक्क, रेशन कार्ड आणि आधार कार्ड आदी मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरू आहे. उन्हात ठिय्या देऊन आपल्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या सुमारे दोन हजार आदिवासी बांधव-भगिनींसाठी जळगाव जिल्हा एकता संघटनेने गुरुवारी भोजनाची व्यवस्था केली.
आंदोलकांच्या मूलभूत गरजांची काळजी घेणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे सांगत संघटनेने मानवतेच्या नात्याने आंदोलनाला साथ दिली. शुक्रवारीही आंदोलकांना पुरी-भाजी देण्यात येणार असल्याची माहिती फारुक शेख यांनी दिली.
यावेळी फारुक शेख यांनी, “आंदोलकांना भोजन देण्यासाठी संघटना पुढे येते; मग त्यांच्या न्याय्य मागण्या ऐकण्यासाठी जळगावातील चार मंत्र्यांपैकी एकही मंत्री आंदोलनस्थळी का येत नाही?” असा सवाल उपस्थित केला.
ही कोणत्याही व्यक्तीविरोधातील भूमिका नसून आदिवासी बांधवांच्या न्याय्य आणि संविधानिक हक्कांच्या संघर्षाला मानवतेच्या नात्याने साथ देणे, हाच संघटनेचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आंदोलकांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा आणि संबंधित मंत्र्यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांशी संवाद साधावा, अशी मागणी एकता संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली.
या शिष्टमंडळात हाफिज रहीम पटेल, मौलाना कासीम, मौलाना शफीक पटेल, मौलाना इम्रान काकर, मौलाना गुफरान, अनवर सिकलगर, मतीन पटेल आणि आरिफ देशमुख आदी उपस्थित होते.



