अमळनेर तालुक्यात अवकाळी गारपीटीचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहर आणि ग्रामीण भागात सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता अचानकपणे गारपीटीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे रब्बी हंगाम देखील हातातून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरासह तालुक्यातील सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या गारपीटीमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, हरभरा, मका, ज्वारी, बाजरी आणि काही फळ पिकांच्या बागांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात अमळनेर तालुक्यातील पातोंडा, नांद्री, दहीवद, मुंगसे, सावखेडा, निमगव्हाण खेडी यागावात गारपीटीने झोडपून काढले आहे. यात काही घरांची पडझड देखील झाल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. प्रशासनाने मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपासून शेत शिवारात जावून पंचनामा करण्यास सुरूवात केली आहे. शासनाने नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

Protected Content