‘अमळनेर’ तालुक्यात असंघटित कामगारांच्या ई-श्रम कार्डची उच्चांकी नोंदणी

अमळनेर, लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । भाजपाचे दिवंगत नेते उदय वाघ यांच्या जयंती निमित्त असंघटित क्षेत्रातील कामगारांचे मोफत ‘ई-श्रम कार्ड’ नोंदणी अभियान अमळनेर तालुक्यात सुरू झाले असताना या अभियानामुळे सुमारे ५ हजारांच्यावर उच्चांकी नोंदणी झाली आहे.

दि.२२ डिसेंबर २०२१ पासून सुरु झालेल्या या उपक्रमात नोंदणीनंतर शहरासह गावोगावी या कार्डचे मोफत वितरण माजी आ.स्मिताताई वाघ यांच्या हस्ते सुरू झाले आहे . या अभियानानंतर्गत ग्रामीण जनतेसाठी गावोगावी कॅम्प लावण्यासह महिला भगिनींपर्यंत स्वतः पोहोचून नोंदणी करून घेतल्याने तालुक्यात महिला कामगारांची नोंदणी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे.

शासनाच्या माध्यमातून कामगार बांधवाना जास्तीत जास्त योजनांचा लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले जात असून उदय वाघ यांना श्रद्धांजली म्हणून माजी आ.स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली व भाजयुमो प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार हिताचे हे नोंदणी अभियान अमळनेर येथून सुरू झाले आहे.

‘ई-श्रम’ ही केंद्र शासनाची योजना असून या माध्यमातून सीएससी ई-श्रम वर ३८ कोटी संघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी केली जाणार आहे, असंघटित क्षेत्रातील कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस देखील यातून तयार केला जाणार आहे. या योजनेचा लाभ अमळनेर तालुक्यातील जास्तीत जास्त कामगार बांधवाना मिळवून देण्याच्या प्रयत्नातून मोफत नोंदणी करत उच्चांकी नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे.

अभियानाच्या सुरवातीला शहरात मोठा कॅम्प लावला असता शहरी कामगारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता, मात्र त्यावेळी जे कामगार वेळे अभावी पोहचू शकले नाहीत त्यांच्यासाठी शहरात प्रभागनिहाय कॅम्प लावण्यात आले,त्यानंतर ग्रामिण भागात कॅम्प लावले गेले,महिला भगिनींपर्यंत तर आम्ही स्वतः पोहोचून नोंदणी करून घेतली,बघता बघता सुमारे 5 हजारांच्या वर कामगार बंधू आणि माता भगिनींची नोंदणी यात झाली असून या अभियानामुळे कदाचित परिसरातील तालुके आणि जिल्ह्यात अमळनेर तालुका अव्वल असावा असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

प्रत्यक्षात स्पर्धा करणे किंवा प्रसिद्धी मिळवणे हा या अभियानाचा उद्देश नसून केवळ एकही कामगार बंधू या योजनेपासून वंचित राहू नये हाच आमचा प्रयत्न असल्याची भावना भैरवी वाघ पलांडे यांनी व्यक्त करत सर्वाना टप्याटप्याने कार्ड दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासह कामगारांसाठी सरकारच्या माध्यमातून अनेक योजना व संधी उपलब्ध होण्याचे संकेत मिळाले असल्याची माहिती देत अजूनही ज्यांची नोंदणी राहिली असेल त्यानी नोंदणी करुन घ्यावी आवाहन त्यांनी केले आहे.

Protected Content