जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कर्नाटकला जाण्यापुर्वी घरुन जेवण करुन निघालेल्या तरुणाची दुचाकी दुभाजकावर आदळल्याने गणेश प्रकाश पाटील (वय ३६, रा. आशाबाबा नगर) यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २३ जानेवारी रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास शिवकॉलनी उड्डाणपुलावर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील आशाबाबा नगरात गणेश पाटील हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. त्यांच्याकडे आयशर ही मालवाहू वाहन चालवून आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. मंगळवारी २३ जानेवारी रोजी सायंकाळी त्यांनी कर्नाटक जाण्यासाठी कंपनीतून मालाची गाडी भरली आणि ते जेवणासाठी घरी आले. जेवण आटोवून रात्री १० वाजेच्या सुमारास ते (एमएच १९ बीएन ८३९०) क्रमांकाच्या दुचाकीने गाडी लावलेल्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले. शिवकॉलनीजवळील रेल्वे उड्डाणपुलावरुन जात असतांना त्यांची दुचाकी दुभाजकावर आदळली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी गणेश यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र तावडे हे करीत आहे.