रंग खेळण्यास मनाई केल्याचा राग; वेटरसह एकाला बेदम मारहाण !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील हॉटेल राज पॅलेस येथे रंग खेळण्यास मनाई केल्याच्या रागातून हॉटेलच्या वेटरसह एकाला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवार २५ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मारहाण करणाऱ्या तीन जणांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर रोडवरील हॉटेल साई पॅलेस येथे सुमित हरीषकुमार राहुजा रा. सिंधी कॉलनी, अमळनेर हे सोमवारी २५ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजता आले होते. त्यावेळी हॉटेलात गणेश दामू जाधव, राजू दामू जाधव आणि विकास धनगर सर्व रा. ताडेपूरा अमळनेर हे देखील बसलेले होते. धुलीवंदन असल्याने हे तिघे हॉटेलात आरडा ओरड करत एकमेकांना रंग लावण्याचे काम करत होते. त्यावेळी हॉटेलेचा वेटर विक्की धनश्याम दरडा याने तिघांना सांगण्याचा प्रयत्न केला की, “तुम्ही बाहेर जावून रंग लावा, बाकीच्या गिऱ्हाईकांना त्रास होतो”, असे सांगितल्याचा राग आल्याने तिघांनी वेटर विक्की दरडा याला मारहाण केली. त्यावेळी सुमित राहूजा यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील बेदम मारहाण केली. यात सुमितच्या गळ्यातील सोनसाखळी तुटल्याने गहाळ झाली. एवढेच नाही तिघांनी सुमितचा घरापर्यंत पाठलाग करत जीवेठार मारण्याची धमकी दिली.

दुसऱ्या दिवशी या घटनेप्रकरणी मंगळवारी २६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार संशयित आरोपी गणेश दामू जाधव, राजू दामू जाधव आणि विकास धनगर सर्व रा. ताडेपूरा अमळनेर यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करीत आहे.

Protected Content