गोदावरीत दुर्मिळ पिच्युटरी ग्रंथीच्या ट्यूमरवर यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव, प्रतिनिधी | मुंबई, पुणे, नाशिकच्या धर्तीवर गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात न्यूरोसर्जन, कान-नाक-घसा तज्ञ, एन्डोक्रोनॉलॉजी तज्ञांच्या सहकार्याने पिच्युटरी ग्रंथीतील ट्यूमवर यशस्वी शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली.

 

शिरपूर येथील रहिवासी असलेल्या प्रौढावस्थेतील रुग्णाला अनेक दिवसांपासून डोके दुखण्याची समस्या होती. अचानक त्याच्या उजव्या डोळ्याची दृष्टी बंद झाली, पापणीही पडल्याने नातेवाईक घाबरले, औरंगाबादपर्यंत उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यानंतर जळगाव येथील न्यूरोजसर्जन डॉ. स्वप्नील पाटील यांना रुग्णासह नातेवाईक भेटले,  यावेळी एमआरआयचा रिपोर्ट पाहिला असता रुग्णाला मेंदूच्या पायथ्याशी ट्यूमर आणि सभोवताली रक्‍तस्त्राव झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. याप्रसंगी कान-नाक-घसा तज्ञ डॉ.विक्रांत वझे, एन्डोक्रोनॉलॉजी डॉ. चिमु चोपडे यांच्याशी न्यूरोलॉजिस्ट डॉ. स्वप्नील पाटील यांनी चर्चा केली. चर्चेअंती डॉ. स्वप्नील पाटील, डॉ.विक्रांत वझे, डॉ. चिमु चोपडे यांनी पिच्यूटरी ग्रंथीची गुंतागुंतीची असलेली शस्त्रक्रिया भुलतज्ञ डॉ.शितल, डॉ.देवेंद्र यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडली.

या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेबाबत न्यूरोसर्जन डॉ. स्वप्नील पाटील यांनी सांगितले की, पिच्यूटरी ट्यूमर ही एक मोठी शस्त्रक्रिया असून त्यासाठी रुग्ण मुंबई, पुणे, नाशिक येथे जातात. मात्र ही सुविधा डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपलब्ध आहे. कुठल्याहीप्रकारची चिरफाड न करता नाकावाटे आणि दुर्बिणीद्वारे ५ तासांच्या कालावधीत ही शस्त्रक्रिया झाली. यात मेंदूतील रक्‍तवाहिन्या फुटणे, मेंदूतुन पाणी गळणे, कोमात जाणे, डोळे पूर्णत: जाणे अशी रिस्क होती मात्र आम्हा तज्ञांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.

कान-नाक-घसा तज्ञ डॉ.विक्रांत वझे यांनी स्पष्ट केले की, शस्त्रक्रियेआधी आणि नंतरही रुग्णाची पेरिमेट्री चाचणी करण्यात आली, यातून दृष्टीपटलाची क्षमता आली, आम्ही टिमवर्कने शस्त्रक्रिया केली आणि त्याला यश आले. रुग्णाला दिसायला लागले, त्याचप्रमाणे पडलेली पापणीही काही अंशी वर जात आहे. एकाच छताखाली स्पेशालिस्ट डॉक्टरांची फळी असल्याने पिच्यूटरी ग्रंथीतील ट्यूमर पूर्णत: काढण्याची शस्त्रक्रिया झाली असून रुग्णाची त्रासातून सुटका झाली.
– ,

Protected Content