वारंवार विषाची परीक्षा घेतल्याचा संजय पवार यांना जबर फटका !

जळगाव-जितेंद्र कोतवाल ( एक्सक्लुझीव्ह अॅनालिसीस ) | जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार हे गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या निर्णयांच्या विरोधात वागल्यानंतर आज गिरीशभाऊंच्या वाढदिवसाला दिलेल्या जाहिरातीमुळे आगीत तेल पडले. विषाची परिक्षा घेण्याचा त्यांना फटका पडला असून आमदार एकनाथराव खडसे व रवींद्रभैय्या पाटलांशी घेतलेले वैरदेखील त्यांना बरेच महागात पडले आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष, जिल्हा दुध संघाचे संचालक तथा मार्केटींग फेडरेशनचे अध्यक्ष संजय पवार हे सहकार क्षेत्रातील अतिशय मातब्बर असे व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाते. जिल्हा बँकेत तब्बल २५ वर्षांपासून अव्याहतपणे निवडून येण्याची किमया त्यांनी केली आहे. जिल्हा दुध संघातही ते सदस्य असून कोणत्याही राजकीय स्थितीत स्वत:ला बरोबर मोल्ड करण्याचे कसब त्यांना अवगत आहे. मात्र गेल्या काही महिन्यातील घटना या त्यांना सहकारात पुढे नेणार्‍या तर ठरल्याच पण यामुळे पक्षातील त्यांच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले.

यात पहिला खटका पडला तो जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत ! यात संजय पवार यांनी थेट भाजप-शिंदे गटाच्या पॅनलमधून उमेदवारी करत विजय संपादन केला. याप्रसंगी त्यांचे जाहीरपणे आ. एकनाथराव खडसे यांच्याशी वाद झाले. याप्रसंगी नाथाभाऊंनी राष्ट्रवादी पक्षातर्फे संजय पवार यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते. तथापि, आपल्याला राष्ट्रवादीतून कुणीही काढू शकत नाही असे संजय पवार म्हणाले. आणि त्यांच्या म्हणण्यानुसारच झाले. अर्थात, त्यांच्यावर कारवाई झाली नाही. याऊलट पवार हे वरिष्ठांना भेटून देखील आले.

दुसरा खटका आणि तो देखील मोठा पडला तो, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ! खरं तर, गुलाबराव देवकर यांच्या राजीनाम्याची काही आवश्यकता नसतांना त्यांचा राजीनामा घेण्यात आला. यानंतर जिल्हा बँकेतील खडसेंचे वर्चस्व नेस्तनाबूत करण्याची मोठी संधी दोन्ही मंत्र्यांना आली आणि त्यांनी संजय पवार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अचूक निशाणा मारला. महाविकास आघाडीला भरभक्कम बहुमत असतांना थेट संजय पवार यांनाच जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची उमेदवारी देऊन अवघ्या एक मताच्या अंतराने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांना पराभूत करण्यात आले. यामुळे संजय पवार हे जिल्हा बँकेचे कारभारी झाले. तेव्हा देखील त्यांच्यावर कारवाई झाली नाही. ते अजितदादांसह वरिष्ठांचा आशीर्वाद घेऊन देखील आले. तशा बातम्या देखील देण्यात आल्या. अर्थात, इतके सारे होऊन देखील पक्षातर्फे कारवाई झाली नाही.

तिसरा खटका पडला तो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ! धरणगाव-एरंडोल बाजार समितीच्या निवडणुकीत संजय पवार यांनी पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी केली. एवढेच नव्हे तर, या निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी फलकांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो देखील वापरले. आणि पॅनलच्या प्रचारात चक्क राष्ट्रवादी ( संजय पवार गट ) असा देखील उल्लेख करण्यात आला. जिल्ह्यातील नेत्यांनी याबाबत वरिष्ठांना तक्रारी करून देखील काहीही कार्यवाही न झाल्याने पक्षात अजूनच अस्वस्थता वाढली. इतक्या वेळेस आगळीक करून देखील काहीही कार्यवाही होत नसल्याने चर्चेला उधाण आले.

आज चौथा खटका आणि खर्‍या अर्थाने आगीत तेल पडले. संजय पवार यांनी थेट ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. खरं तर विरोधी नेत्यांना शुभेच्छा देण्यात काही गैर नाही. तथापि, तब्बल एका पानाच्या जाहिरातीत थेट अजित पवार आणि शरद पवार यांचे फोटो वापरल्याने राज्यभरात हा चर्चेचा विषय बनला. यामुळे या प्रश्‍नावर पक्षाला काही तरी कठोर कार्यवाही करणे भाग होते. आणि झाले देखील तसेच ! आज संजय पवार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. हे निलंबन नसून बडतर्फी असल्याची बाब लक्षात घेण्यासारखी आहे. यामुळे वारंवार विषाची परीक्षा घेण्याचा फटका त्यांना बसला आहे. तर नाथाभाऊ आणि रवींद्रभैय्या यांच्या सारख्यांना अंडर एस्टीमेट करण्याचा फटका देखील त्यांना बसल्याचे दिसून आले आहे.

खरं तर पक्षातून निलंबन वा बडतर्फी हा काही फार मोठा मुद्दा नाही. यामुळे संजय पवार यांच्यावरील कारवाई ही भविष्यात रद्द देखील होऊ शकते. अर्थात, ते पुन्हा पक्षात येऊ शकतात. तथापि, आजवर सहसा कुणाला अंगावर न घेत सहकारातील आपला बालेकिल्ला शाबूत ठेवणार्‍या संजयभाऊंच्या सर्वसमावेशक आणि प्रत्येक पक्षात मैत्री जोपासण्याच्या पॅटर्नला आता धक्का बसणार आहे. त्यांच्या मार्गात आता अडसर निर्माण होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे जळगाव ग्रामीणमधील गुलाबराव देवकर यांचा पक्षातील एक संभाव्य स्पर्धक रिंगणाबाहेर गेल्याने त्यांना दिलासा मिळणार असला तर एक मातब्बर मराठा चेहरा सोबत आल्याचा ना. गुलाबराव पाटील यांना थेट लाभ देखील होणार आहे. भारतीय जनता पक्षाला यातून थेट काही लाभ वा हानी होणार नसली तरी राष्ट्रवादीत केलेली काडी ही वावटळ बनल्याची मजा त्यांना स्वस्थपणे लुटता येणार आहे.

जर संजय पवार यांच्यावरील राष्ट्रवादीतील बडतर्फीची कारवाई ही लवकरात लवकर मागे घेण्यात आली नाही तर ते नेमके कुठे जाणार ? भाजपमध्ये की शिवसेनेत ? या प्रश्‍नाचे उत्तर मात्र काळच देणार आहे. तूर्तास एकाच वेळेत आपल्या पक्षातील अनेकांना अंगावर घेणे, पक्षाच्या धोरणांच्या विरोधात जाहीर भूमिका घेणे आणि अर्थातच विरोधी पक्षाच्या नेत्याच्या वाढदिवसाला दिलेली कल्पकताशून्य जाहिरात ही संजय पवार यांना धक्का देणारी ठरली यात शंकाच नाही.

Protected Content