भाजपाचे कृत्रिम वीजटंचाईच्या विरोधात उद्या राज्यव्यापी कंदील आंदोलन

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राज्यातील वीज टंचाईच्या विरोधात उद्या २४ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी कंदिल आंदोलन करण्यात येणार आहे.  भाजपा कार्यकर्ते शहरातील प्रमुख ठिकाणी राज्य सरकारच्या कारभाराच्या निषेधार्थ कंदील घेऊन उभे राहतील, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे  व महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी दिली आहे.

 

आ.सुरेश दामु भोळे (राजुमामा) यांनी सांगितले की,  राज्यातील सध्याच्या वीजटंचाईच्या समस्येला राज्य सरकारच जबाबदार असून राज्यात अघोषित भारनियमन सुरूच आहे. दीड तासांपासून सहा तासांपर्यंत वीज गायब असल्याने ग्राहक होरपळत असताना सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारने ग्राहकाच्या खिशातून सुरू केलेली सक्तीची वसुली ताबडतोब थांबविण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात येणार आहे. खाजगी क्षेत्राकडून वीज खरेदीच्या दरावर केंद्र सरकारने मर्यादा घातल्याने राज्य सरकारमधील हितसंबंधीयांची कोंडी झाली असून टक्केवारीच्या राजकारणात अडथळे येत असल्याने त्यांचा जळफळाट सुरू आहे. त्यामुळेच कृत्रिम टंचाई निर्माण करून जनतेला वीजसंकटात ढकलले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. सरकारी कार्यालयांची बिले थकविणारे व ग्राहकांची लुबाडणूक करणारे आघाडी सरकार हेच सर्वात मोठे वीजचोर असून तातडीने थकबाकीची रक्कम वीज मंडळास देऊन वाढीव सुरक्षा अनामत वसूल करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा, अन्यथा विजेच्या प्रश्नावर महाराष्ट्रात मंत्र्यांना जागोजागी जाब विचारला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे

Protected Content