अनधिकृत बियाणे व खतसाठा जप्त : चोपड्यातील कृषी केंद्रावर धाड, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील मौजे वैजापूर येथे मे. न्यू लक्ष्मी कृषी केंद्रावर जिल्हास्तरीय भरारी पथकाने छापा टाकून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बियाणे आणि रासायनिक खतांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी कृषी केंद्राचे प्रोप्रायटर योगीराज देवसिंग पाटील यांच्याविरोधात विविध कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजे वैजापूर येथील न्यू लक्ष्मी कृषी केंद्राचे प्रोप्रायटर योगीराज देवसिंग पाटील (वय ३०, रा. नागलवाडी) हे २५ मे २०२५ पासून विनापरवाना अनधिकृतपणे बियाणे आणि रासायनिक खतांची विक्री करत असल्याची माहिती जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळाली होती. योगीराज पाटील हे शासनाची दिशाभूल करून कोणतीही परवानगी नसताना मोठ्या प्रमाणावर खते आणि बियाणे विकत असल्याचे निदर्शनास आले.

या माहितीच्या आधारे जिल्हास्तरीय भरारी पथकाने तात्काळ कृषी केंद्रावर छापा टाकला. या छाप्यात कृषी केंद्रात विनापरवाना विक्रीसाठी साठवून ठेवलेले सुमारे २० टन (४०५ गोण्या) रासायनिक खत, ज्याची किंमत ४ लाख ५२ हजार ४४६ रुपये आहे, आणि मका व कापूस पिकांचे १८८ बियाणे पॅकेट्स, ज्यांची किंमत २ लाख ८३ हजार ४१८ रुपये आहे, असा एकूण ७ लाख ३५ हजार ८६४ रुपयांचा रासायनिक खत आणि बियाणे साठा जप्त करण्यात आला. या साठ्याच्या विक्रीवर तात्काळ बंदी आदेश (स्टॉप सेल) देण्यात आला आहे.

या प्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी श्री. विकास बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून योगीराज देवसिंग पाटील यांच्याविरोधात बियाणे कायदा १९६६, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, खत नियंत्रण कायदा १९८५, आणि अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ यातील कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत जिल्हा परिषद, जळगावचे मोहीम अधिकारी अविनाश खैरनार, पंचायत समिती, चोपडा येथील कृषी अधिकारी किरण पाटील, आणि हातेड, तालुका चोपडा येथील मंडळ कृषी अधिकारी रामचंद्र पाटील यांनी संयुक्तपणे कायदेशीर कारवाई केली. सदरील कारवाई मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, आणि कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमुळे शेतकऱ्यांची फसवणूक थांबण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.