Home Cities जळगाव गरिबांच्या चुली पेटवा, समाजात प्रेमाचा दिवा लावा – प्रा. सोहेल अमीर शेख 

गरिबांच्या चुली पेटवा, समाजात प्रेमाचा दिवा लावा – प्रा. सोहेल अमीर शेख 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । समाजात वाढत चाललेल्या दुराव्याच्या पार्श्वभूमीवर परस्परांमध्ये प्रेम, आदर आणि बंधुभाव निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित करत, “काही पेटवण्याची इच्छा असेल तर गरिबांची चूल पेटवा,” असे हृदयस्पर्शी आवाहन प्रख्यात वक्ते प्रा. सोहेल अमीर शेख यांनी केले. ईदमिलन सोहळ्यात त्यांनी समाजप्रबोधनाचा संदेश देत उपस्थितांना अंतर्मुख केले.

जमाअत-ए-इस्लामी हिंद, उमरखेड यांच्या वतीने स्थानिक अनंतराव देवसरकर सभागृहात आयोजित ईद मिलन कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, आज जगात वाढत चाललेल्या विभाजनामागे माणसाची अहंकाराची भावना कारणीभूत आहे. प्रत्येकाने स्वतःला श्रेष्ठ समजण्याऐवजी सर्व मानव एकाच परमेश्वराची संतती आहेत, ही जाणीव ठेवणे अत्यावश्यक आहे. एकमेकांचा आदर करणे हाच इस्लामचा मूलभूत संदेश असून, त्यातूनच समाजात शांतता आणि सलोखा निर्माण होऊ शकतो.

रोजाच्या आध्यात्मिक महत्त्वावर प्रकाश टाकताना प्रा. शेख म्हणाले की, रोजा म्हणजे केवळ उपवास नव्हे, तर स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची एक शिस्त आहे. ईश्वराच्या आज्ञेचे पालन करताना माणूस आपल्या हक्काच्या अन्न-पाण्यापासून दूर राहतो. मात्र, जर उर्वरित ११ महिने आपण हराम कमाई, वाईट सवयी आणि व्यसनांपासून दूर राहिलो, तरच रोजाचे खरे उद्दिष्ट साध्य होईल. नैतिकतेचे पालन करताना त्यांनी सांगितले की, जो व्यक्ती आपल्या पत्नीबद्दल वाईट विचार करू शकत नाही, तो इतरांच्या माता-भगिनींकडे चुकीच्या नजरेने कसा पाहू शकतो? हीच शिकवण रोजा देतो.

त्यांनी पुढे सांगितले की, जर प्रत्येकाला आपण ईश्वराच्या देखरेखीखाली आहोत, याची जाणीव झाली, तर समाजातील गुन्हेगारी, द्वेष आणि अन्याय आपोआप कमी होईल. गरिबांच्या गरजा पूर्ण करणे आणि मुलांना योग्य नैतिक शिक्षण देणे हीच खरी समाज विकासाची गुरुकिल्ली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमात ‘प्रेम आणि बंधुत्व’ यांवर आधारित भारत घडवण्याची सामूहिक प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भन्ते किर्ती बोधी, अकील मिर्झा (जिल्हा संघटन यवतमाळ), शेख नईम (पुसद), हनुमंतराव गायकवाड, विजय बेतेवाड, शंकर पांचाळ, शिवाजीराव वानखेडे, विजय रेघाटे, डॉ. आशिष खांबाळकर, डॉ. दळवी, प्रा. धनराज तायडे यांच्यासह शहरातील नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound