Home Cities जळगाव गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्थानिक गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महामानवाच्या विचारांना उजाळा देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी ग्रंथपाल प्रा. नकुल गाडगे यांनी भावपूर्ण रीतीने बौद्ध वंदना सादर केली. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना प्रमुख पाहुण्या डॉ. नयना झोपे यांनी भारतीय राज्यघटनेचे महत्त्व विशद केले. शिक्षणाशिवाय प्रगती शक्य नाही, हा डॉ. आंबेडकरांचा संदेश अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचे आणि ध्येयवादाचे अनुकरण करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात या महापुरुषांच्या कार्याचा सविस्तर परिचय करून देण्यात आला.
जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत समीक्षा तायडे हिने प्रथम, तर शेख अल्तमश याने द्वितीय क्रमांक पटकावून आपले नैपुण्य सिद्ध केले. या सोहळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, समन्वयक प्रा. दीपक झांबरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन काजल पाटील व डिंपल पाटील यांनी केले.


Protected Content

Play sound