Home Cities जळगाव विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षणाची माहिती आता ऑनलाइन

विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षणाची माहिती आता ऑनलाइन

0
9

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील मतदारांसाठी महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची यादी तसेच विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमासंदर्भातील वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महाराष्ट्र राज्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला २० जून २०२६ पासून प्रारंभ झाला असून, हा उपक्रम ७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त ठेवणे हा असून, पात्र नागरिकांची नावे समाविष्ट करणे तसेच आवश्यक दुरुस्त्या करणे यावर भर दिला जात आहे.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदारांना आवश्यक माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने अधिकृत संकेतस्थळावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची सविस्तर यादी प्रसिद्ध केली आहे. यामुळे संबंधित मतदान केंद्रासाठी नियुक्त अधिकाऱ्यांची माहिती नागरिकांना घरबसल्या मिळू शकणार आहे. तसेच पुनरिक्षण प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या शंकांचे निरसन करण्यासाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) आणि त्यांची उत्तरेही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, मतदारांनी अधिकृत संकेतस्थळावरील माहितीचा वापर करून पुनरिक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती, पत्ता बदल किंवा इतर आवश्यक बाबींसाठी संबंधित BLO यांच्याशी संपर्क साधून वेळेत कार्यवाही करण्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


Protected Content

Play sound