जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी मनपा आयुक्त आदित्य जिवने यांनी गुरुवारी (१६ जुलै) शहरातील मनपा दवाखान्यांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान आरोग्य सुविधा आणि कामकाजाच्या पद्धतीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना विविध सुधारणा तातडीने राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच एमबीबीएस डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याचे संकेतही त्यांनी दिले.
पाहणीदरम्यान आयुक्त आदित्य जिवने यांनी दवाखान्यांमधील आरोग्य सुविधा, रुग्णांना मिळणाऱ्या सेवा, स्वच्छता, कर्मचारी व्यवस्था तसेच एकूणच कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी विद्यमान आरोग्य व्यवस्था अपेक्षित दर्जाची नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच कामकाजासाठी आवश्यक असलेले वातावरणही समाधानकारक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दवाखान्यांमध्ये एमबीबीएस डॉक्टरांची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत असल्याने ही उणीव दूर करण्यासाठी लवकरच एमबीबीएस डॉक्टरांच्या भरतीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. नागरिकांना अधिक दर्जेदार आणि तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही बाब प्राधान्याने हाती घेतली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

मनपा मालकीच्या दवाखान्यांचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्याचा निर्णयही यावेळी जाहीर करण्यात आला. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक नागरिकांना सहज आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.आरोग्य सेवांमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि वेग वाढविण्यासाठी डिजिटल यंत्रणा विकसित करण्यावरही भर देण्यात येणार आहे. रुग्ण नोंदणी, वैद्यकीय नोंदी, औषध वितरण आणि इतर प्रशासकीय कामकाज टप्प्याटप्प्याने डिजिटल पद्धतीने करण्याची योजना राबविण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
मनपा प्रशासनाने आरोग्य सेवांमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, आवश्यक मनुष्यबळ, आधुनिक सुविधा आणि डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना अधिक सक्षम, दर्जेदार आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली जाणार आहेत.



