Home Cities जळगाव पिंप्राळा–निमखेडीच्या विकासाला वेग! रस्ते-गटारींच्या कामांचा शुभारंभ; स्मशानभूमीला तत्काळ मंजुरी देण्याची गुलाबराव पाटील...

पिंप्राळा–निमखेडीच्या विकासाला वेग! रस्ते-गटारींच्या कामांचा शुभारंभ; स्मशानभूमीला तत्काळ मंजुरी देण्याची गुलाबराव पाटील यांची ग्वाही

0
2

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा–निमखेडी परिसरातील रस्ते व गटारींच्या विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी (दि. २१) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी दिलेला शब्द पाळल्याचे समाधान व्यक्त करत कामांचा दर्जा व मुदत राखण्याचे निर्देश देतानाच पिंप्राळा स्मशानभूमीच्या बांधकामासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यास तत्काळ मंजुरी देण्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

मागील वेळी या परिसरात आलो होतो, तेव्हा नागरिकांना रस्त्याचे काम मंजूर करून देण्याचा शब्द दिला होता आणि आज त्याच रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना मनापासून समाधान वाटत असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. लोकांचा विश्वास हीच आपली खरी ताकद असून दिलेला शब्द पाळण्यातच लोकप्रतिनिधी म्हणून खरे समाधान असल्याचे त्यांनी नमूद केले. रस्त्याचे काम दर्जेदार व निर्धारित मुदतीत पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच पिंप्राळा परिसरातील स्मशानभूमीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत बांधकामासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यास तत्काळ मंजुरी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक ८ व १० मधील पिंप्राळा–निमखेडी परिसरातील शिवरोड येथील रस्ते व गटारींच्या विकासकामांचा शुभारंभ कुदळ मारून व श्रीफळ वाढवून उत्साहात पार पडला. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानातून हाती घेण्यात आलेल्या या कामांना मागील वर्षी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मंजुरी दिली होती. या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, खासदार स्मिता वाघ तसेच महापौर दीपमाला काळे व उपमहापौर मनोज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मूलभूत सुविधांच्या विविध कामांना महापालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली होती. या वेळी आमदार राजूमामा भोळे यांनी रस्त्यांच्या कामांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले. उपलब्ध निधी व प्राधान्यक्रमानुसार शहरातील विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, असे आमदार भोळे यांनी सांगितले.

या भूमिपूजन सोहळ्याचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपमहापौर मनोज चौधरी यांनी केले, तर नगरसेवक अरविंद देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमास महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा गटनेते विष्णू भंगाळे, स्थायी समिती सदस्य तथा भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह नगरसेवक गणेश सोनवणे, आशुतोष पाटील, अरविंद देशमुख, कुंदन काळे, सुरेश सोनवणे, माधुरी बारी, जाकिर खान, कविता भोई, कविता पाटील, अमर जैन, नरेंद्र पाटील, मानसी भोईटे व जयश्री पाटील उपस्थित होते. तसेच महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, शहर अभियंता आर. टी. पाटील, अभियंता मनोज वनेरे, स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound