अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी पारंपरिक श्री तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक विधी, मंगलाष्टके आणि पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न होणार असून, भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
या दिवशी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी मंगलाष्टकांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी मुख्य तुळशी विवाह सोहळा पार पडणार आहे. भगवान श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी माता यांचा परमपवित्र विवाह पूर्णतः शास्त्रोक्त आणि पारंपरिक हिंदू संस्कृतीनुसार संपन्न होईल.

विशेष म्हणजे, मंगळग्रह सेवा संस्थेने समाजाभिमुख आणि काळाची गरज ओळखून विवाह सोहळे साधेपणाने करण्याचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. विवाह समारंभात अनावश्यक खर्च आणि पैशांची उधळपट्टी टाळून पूर्णतः विधिवत व साध्या पद्धतीने विवाह करण्याची शपथ या उपक्रमांतर्गत दिली जाते. याच सामाजिक विचाराचा आदर्श ठेवत मागील काही वर्षांपासून मंदिरातील तुळशी विवाह सोहळाही अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. या सोहळ्यासाठी भव्य सजावट किंवा स्नेहभोजनावर संस्थेकडून कोणताही खर्च केला जात नाही. धार्मिक परंपरा, संस्कृती आणि शास्त्रोक्त विधींना प्राधान्य देत अनावश्यक खर्च टाळण्याचा संदेश या माध्यमातून दिला जात आहे. धार्मिक उत्सव साजरा करतानाच समाजात साधेपणा आणि सामाजिक जाणीव रुजविण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.



