दुचाकी चोरी करून मध्यप्रदेशात विक्री करणाऱ्या दोन जणांना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । मध्यप्रदेशात कमी किंमतींमध्ये दुचाकींची विक्री करणाऱ्यांचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन संशयितांना मध्य प्रदेशातील खंडवा येथून पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या ६ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यप्रदेशातील खंडवा येथील संशयित कामानिमित्त एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास होता. शहरातील विविध भागातून तो दुचाकी चोरुन नेत मध्यप्रदेशातील पिपलोद येथे त्या दुचाकी कमी किंमतीमध्ये आपल्या साथीदारांच्या मदतीने विक्री करीत होता. दरम्यान, या संशयितांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी लांबवल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी लागलीच पथक तयार करुन कारवाईसाठी खंडवा येथे रवाना केले. या पथकाने खंडवा येथून बुधवार २० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता अनोप धनसिंग कलम (कोरकु) (वय १८, रा. सुकवी, जि. खंडवा) व अंकीत सुकलाल ठाकूर (कोरकु) (वय २२, रा. मुसाखेडी इंन्दौर, मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी सहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली. दरम्यान, पथकाने त्या दोघांकडून जळगावातून चोरी केलेल्या ६ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

Protected Content