अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।अमळनेर तालुक्यातील जानवे येथील १८ वर्षीय भाग्यश्री दीपक पाटील या तरूणीचा १२ मे रोजी रात्री ८.३० वाजता अज्ञात वाहनाने कट मारल्याने तोल जावून दुचाकी थेट झाडाला आदळल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अमळनेर-धुळे रस्त्यावरील लोंढवे फाट्याच्या पुढे घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाग्यश्री ही जानवे येथील रहिवासी असून, ती शिक्षण घेत असताना आपल्या वडिलांना दुग्ध व्यवसायात मदत करत होती. दुधाचे कॅन मोटरसायकलला बांधून ती जानव्याहून कधी धुळे, तर कधी अमळनेर येथे दूध पोहोचवण्याचे काम एकटीने करत असे. सुरुवातीला तिने वडिलांसोबत दूध वाटपाचे काम केले आणि नंतर एकटीने मोटरसायकलवरून दूध घेऊन जाण्यास सुरुवात केली. तिच्या या मदतीमुळे वडिलांच्या दुग्ध व्यवसायात चांगली वाढ झाली होती.
दुर्दैवाची बाब म्हणजे, दीड महिन्यांपूर्वी भाग्यश्रीचे वडील मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात जखमी झाले होते आणि डॉक्टरांनी त्यांना मोटरसायकल चालवण्यास मनाई केली होती. अशा परिस्थितीत, नेहमीप्रमाणे भाग्यश्री काल रात्री साडेआठच्या सुमारास (एम एच १९, ई बी ६०२७) क्रमांकाच्या मोटरसायकलवरून दुधाचे कॅन घेऊन अमळनेरकडे येत होती. लोंढवे शिवारात अज्ञात वाहनाने तिला कट मारल्याने तिची मोटरसायकल रस्त्यावर आडव्या पडलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात भाग्यश्री खाली पडून तिच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
या घटनेची माहिती भूषण पाटील यांनी जानवे गावात कळवताच, गावकऱ्यांनी तिला तातडीने उचलून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीच भाग्यश्रीचे वडील अपघातात जखमी झाले होते आणि आता भाग्यश्रीचाही मोटरसायकल अपघातात जीव गेल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. एका तरुण व मेहनती मुलीच्या अकाली मृत्यूमुळे जानवे गावात शोककळा पसरली आहे.