अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खान्देश परिसरात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमानाने अक्षरशः विक्रमी पातळी गाठली आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून उष्माघाताच्या घटनांमध्येही चिंताजनक वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांत खान्देशातील विविध भागांत उष्माघातामुळे चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा सतत वाढत असल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. सकाळपासूनच कडक उन्हाचा तडाखा जाणवत असून दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतमजूर, बांधकाम कामगार आणि बाहेर काम करणाऱ्या नागरिकांना उष्णतेचा सर्वाधिक फटका बसत आहे. उष्माघातामुळे काही नागरिकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभाग आणि प्रशासन सतर्क झाले आहे.

काल उष्णतेमुळे चार नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर आज उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयाला भेट देत उष्माघात कक्षाची पाहणी केली. रुग्णालयातील उपचार व्यवस्था, औषधसाठा आणि आपत्कालीन सुविधांची माहिती त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतली. उष्णतेमुळे बाधित रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दुपारच्या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, डोक्यावर टोपी किंवा कपडा वापरावा तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.



