Home Cities पारोळा पारोळा शहराच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा ; वाढीव वस्त्यांतील पाईपलाईन कामाचे भूमिपूजन

पारोळा शहराच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा ; वाढीव वस्त्यांतील पाईपलाईन कामाचे भूमिपूजन

0
13

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ₹५३.७० कोटींच्या भव्य पाणीपुरवठा योजनेचे सुमारे ८० ते ९० टक्के काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून, शहरातील वाढीव वस्त्यांपर्यंतही शुद्ध व नियमित पाणीपुरवठा पोहोचविण्यासाठी पाईपलाईन टाकण्याच्या कामाला आता वेग आला आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

पारोळा शहराचा सातत्याने होत असलेला विस्तार लक्षात घेता काही नव्याने विकसित झालेल्या वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम अद्याप बाकी होते. या भागातील नागरिकांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीची दखल घेत वाढीव वस्त्यांमध्ये पाईपलाईन टाकण्याच्या कामाला अधिकृतपणे प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ₹५३.७० कोटींची ही महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांतून मंजूर झाली असून, विद्यमान आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या पुढाकारातून तिची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. योजनेचे बहुतांश काम पूर्ण झाल्याने उर्वरित कामेही वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

योजना पूर्णत्वास गेल्यानंतर पारोळा शहरातील प्रत्येक घरापर्यंत सुरक्षित, शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शहरातील एकही वस्ती पाणीपुरवठ्यापासून वंचित राहू नये, हा या योजनेचा मुख्य उद्देश असून, भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि शहराचा विस्तार लक्षात घेऊन ही योजना राबविण्यात येत आहे. भूमिपूजन कार्यक्रमाला नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनीष पाटील, तालुकाप्रमुख मधुकर पाटील, उपनगराध्यक्ष रोहन मोरे, नगरसेवक नितीन सोनार, राजाराम पाटील, राजूबापू पाटील, छोटू पाटील, विवेक पाटील, नजीरखान बेलदार, दिपक अनुष्ठान, अमोल शिरोळे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound