महाराष्ट्रात एकूण ९.१२ कोटी मतदार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | निवडणूक आयोगाने 27 ऑक्टोबर 2023 ते 23 जानेवारी 2024 या कालावधीत मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण तसेच शुद्धीकरण कार्यक्रम आयोजित केला होता. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर २०२३च्या प्रारूप मतदार यादीत २४,३३,७६६ मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच २०,२१,३५० मतदारांची वगळणी करण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये ४,१२,४१६ मतदारांची निव्वळ वाढ होऊन एकूण मतदारांची संख्या ९,१२,४४,६७९ इतकी झालेली आहे. त्यानुसार १,०१,८६९ पुरुष मतदारांची, ३,०८,३०६ स्त्री मतदारांची आणि ५७२ तृतीयपंथी मतदारांची निव्वळ वाढ झालेली आहे.

पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये १८ ते १९ या वयोगटामध्ये ६,७०,३०२ मतदारांची नव्याने भर पडली आहे, तसेच २० ते २९ या वयोगटात ८.३३,४९६ मतदारांची वाढ झालेली आहे. प्रारूप यादीत १८ ते १९ या वयोगटाची मतदार संख्या ३,४८,६९१ (०.३८ टक्के) होती, ती जानेवारीच्या अंतिम मतदार यादीत १०,१८,९९३ (१.१२ टक्के) इतकी झालेली आहे. तर २० ते २९ वयोगटाची प्रारूप यादीतील मतदार संख्या १,५५,११,३७६ (१७.८ टक्के) होती, ती अंतिम यादीत १,६३,४४,८७२ (१७.९१ टक्के) इतकी झालेली आहे.

विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांनी राबवलेल्या मतदार नोंदणी शिबिरांमुळे या वयोगटाच्या टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते,अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, सदर सर्वेक्षणात आढळलेल्या मृत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, तसेच दुबार मतदार यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही पुनरीक्षणपूर्व कालावधीत तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत पूर्ण करण्यात आली. त्यानुसार ११,६०,६९६ मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. त्यांपैकी ऐंशीपेक्षा अधिक वय असलेले ४,९२,३९५ मतदार मृत झाले असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांची नावेही वगळण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे मतदार याद्यांमध्ये ९,०५,५५९ एकसारखे फोटो असलेले मतदार (फोटो सिमिलर एन्ट्रीज ) असल्याचे निदर्शनास आले, त्यांची सखोल तपासणी करून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत २,८४,६२० मतदारांच्या नावांची वगळणी करण्यात आली आहे.
तसेच मतदार यादीत नाव व इतर काही तपशील समान असलेले (डेमोग्राफिकल सिमिलर एन्ट्रीज ) २,५४,४६० मतदार आढळून आले. त्यांची सखोल तपासणी करून ७४,४२६ मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत.

ही वगळणी प्रक्रिया मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित मतदारांच्या गृहभेटी घेऊन, स्पीड पोस्टाने नोटिसा पाठवून, तसेच पूर्ण तपासणी-अंती कायदेशीररीत्या करण्यात आलेली आहे. नाव वगळणीच्या या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील अनावश्यक फुगवटा नाहीसा होऊन आता ती अधिक परिपूर्ण झालेली आहे.

 

Protected Content