…तर पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार – मलिक

4Nawab Malik 14

मुंबई, वृत्तसंस्था | “विधीमंडळामध्ये विश्वास ठरावानंतर भाजपाचे सरकार कोसळले तर राष्ट्रवादी पर्यायी सरकारचा विचार करेल,” असे महत्वपूर्ण वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांनी केले आहे. महाष्ट्रातील विधानसभा निवडणुकींचे निकाल लागल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नवाब मलिक आणि जयंत पाटील यांचा समावेश होता. याच बैठकीनंतर  मलिक यांनी विश्वासदर्शक ठरावामध्ये सरकार पडले तर राष्ट्रवादी पर्यायी सरकार स्थापन करण्याचा विचार करु शकते, असे मत व्यक्त केले आहे.

 

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागांवर विजय मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी ५०-५० चे सूत्र वापरण्याची भूमिका शिवसेनेने घेत मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षांसाठी वाटून घेण्याची मागणी केली आहे. यावरुनच आता भाजपा आणि शिवसेनेमध्ये तणाव निर्माण झाला असून दोन्ही पक्षांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार का ? या विषयी चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यातच आज मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर मलिक यांनी व्यक्त केलेल्या मतानंतर नवीन समीकरणांच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना मलिक यांनी पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यतेचा राष्ट्रवादी विचार करेल, असे म्हटले आहे. “भाजपा हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही विरोधीपक्षाच्या भूमिकेत बसण्याची तयारीत आहोत. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने सत्ता स्थापन करावी. विधीमंडळाच्या पटलावर विश्वासदर्शक ठरावामध्ये शिवसेनेने भाजपाविरोधी भूमिका घेतली आणि सरकार पडले तर राष्ट्रवादी पर्याय सरकारचा विचार नक्कीच करेल,” असेही मलिक म्हणाले. विधानसभा निडवणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठी मुसंडी मारली असून ५४ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने ५० जागा जिंकल्या आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्रीपदाची मागणी करणाऱ्या शिवसेनेला दोन्ही काँग्रेस काही ऑफर देऊन सत्ता स्थापन करणार की, शिवसेना आणि भाजपा चर्चेने प्रश्न सोडवून युतीचे सरकार सत्तेत आणणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

शरद पवार आणि पंतप्रधान मोदीमध्ये कोणताही संवाद झालेला नसून त्यांच्यामध्ये फोनवरुन संवाद झाल्याची अफवा परसरवील जात असल्याचे मलिक यांनी सांगितले आहे. “शिवसेनेला अडचणीत आणण्याचे काम भाजपाकडून मागील पाच वर्षांपासून केले जात आहे. मोदी आणि पवारांमधील संवादाची बातमी पेरणे हा त्याचाच एक भाग असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यामध्ये कोणताही संवाद झालेला नाही,” अशी माहिती मलिक यांनी दिली आहे.

विरोधीपक्षात बसणार :- “आम्हाला जनतेने जो कौल दिला आहे तो विरोधीपक्षात बसण्यासाठी दिला आहे. त्यामुळे विरोधीपक्षात बसण्याची आमची प्राथमिक भूमिका आहे,” असे मत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Protected Content