शिंदे यांच्या विनंतीवरूनच फडणवीस बनले उपमुख्यमंत्री ! : चंद्रकांत पाटील

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । हिंदुत्वाच्या रक्षणासाठीच आम्ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत सरकार स्थापन केले आहे. यात शिंदे यांनीच विनंती करून फडणवीस यांच्या अनुभवाचा सरकारला लाभ व्हावा म्हणून त्यांनी सरकारमध्ये रहावे अशी गळ घातल्यानेच त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

आज दुपारी भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद झाली. ते म्हणाले की, संघाच्या सांस्कृतीक राष्ट्रवादीसाठी भाजपची स्थापना झाली आहे. हिंदुत्व हाच आमचा श्‍वास आणि ध्यास असून याचे हित हेच आमचे उद्दीष्ट राहिले आहे. २०१९ साली हिंदुत्वाला जनमताचा कौल मिळाला. मात्र निकालानंतर महाविकास आघाडी अस्तीत्वात आली. महाशिव आघाडी ही कधी महाविकास आघाडी झाली हे कळलेच नाही. यामुळे आमचा विरोध हा हिंदुत्वासाठी आणि विकासासाठी होता. मात्र शिवसेनेने हिंदुत्वाशी फारकत घेतली. त्यांनी हिंदुत्वाची टिंगल उडविली. यातून मतांसाठीचे लांगूलचालन करण्यात आले. मशिदीवरच्या भोंग्याबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मेट्रो, बुलेट ट्रेन आदी प्रकल्प रखडले. ओबीसी आरक्षण घालविण्याचे पाप याच सरकारने केले. मराठा आणि धनगर आरक्षणावर निर्णय घेण्यात आले नाहीत.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्यासह सहकार्‍यांच्या नाराजीतून सरकार पडले. आमच्यासोबत अपक्ष देखील आले. मात्र आम्हाला सत्तेचा मोह नाही. मुख्यमंत्रीपद शक्य असून देखील आम्ही धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिष्याला मुख्यमंत्रीपद देण्यात आले. सत्तेचा मोह हा तुम्हाला असल्याने तुम्ही शब्द मोडला. देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाल्यावरून देखील चर्चा सुरू झाली आहे. प्रशासनाची आवश्यकता म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच फडणवीस यांनी मंत्रीमंडळात असावे अशी विनंती केली. ही माहिती श्रेष्ठींना मिळाल्यानंतर त्यांनी मंत्रीपद स्वीकारल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. हिंदुत्वाच्या रक्षणाची हाक ऐकून देवेंद्रजींनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. ते मुख्यमंत्र्यांसोबत राज्याला पुढे घेऊन जातील. अमित शाह आणि फडणवीस यांच्यात कोणतेही वाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Protected Content