जळगाव प्रतिनिधी | जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या परिसरात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या नवीन निवासस्थान इमारतीचे उद्घाटन राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. मात्र हा कार्यक्रम शासकीय न होता याला पक्षीय स्वरूप देण्यात आल्याचा आरोप करत उचित सन्मान न मिळाल्यामुळे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी राग व्यक्त केला.
याप्रसंगी आ.सुरेश भोळे यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, “मागील सरकारमुळे हे काम पूर्णत्वाकडे आले आहे. आजचा कार्यक्रम हा पक्षाचा नसून शासकीय होता मात्र आजच्या कार्यक्रमात शहराचा आमदार असून आपल्याला पूर्ण तो सन्मान मिळाला नाही, असा आरोप करत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी प्रशासनावर टीका केली.
ते म्हणाले, “मी निवडणुकीच्या दरम्यान फिरत असतांना पाहिलं की, शहरातील पोलीस बांधवांसाठी रहिवाशी क्वाटर्सचा प्रश्न मोठा होता. पूर्वी असलेले बैठे क्वाटर्स जीर्ण झालेले होते. नवीन वसाहत बांधण्याचा प्रस्ताव कधीपासून प्रलंबित होता. तेव्हा दि. २६ मार्च, २०१८ रोजी उन्हाळी अधिवेशनात पोलिसांना नवीन, चांगले व प्रशस्त घरे मिळण्याकरिता पोलीस वसाहतीचा प्रश्न शासनाकडे मांडला. राज्यातील गृह खात्यातून नवीन पोलीस वसाहत व तिथल्या नवीन रस्ते तयार करण्यासाठी शासनाकडून ७० कोटी रुपये मंजूर करून आणले. या कामास ०३ जुलै, २०१९ रोजी सुरुवात करण्यात आलेली होती व दि. ०९ ऑक्टोबर २०२१ रोजी बांधकाम पूर्ण करण्यात आलेले होते. आज सोमवार, दि.२० डिसेंबर २०२१ रोजी त्या ७० कोटी निधीमधून तयार झालेल्या पोलीस हाऊसिंग वसाहतीचे उद्घाटन करण्यात आले. सदर वसाहतीमध्ये ६ इमारतींचा समावेश असून त्यात २५२ शासकीय निवासस्थाने आहेत.
पुढे ते म्हणाले, “लोकप्रतिनिधीचा सन्मान झाला पाहिजे असे भाषणात गृहमंत्री म्हणाले पण प्रत्यक्षात तसे करण्याचा त्यांनाच विसर पडला. आम्ही विरोधक असलो, सत्तेत नसलो तरी हा कार्यक्रम कुठल्या पक्षाचा नसून शासनाचा होता. हवा असलेला प्रोटोकॉल पाळला गेला नाही मी आमदार या नात्यांने येथे आलो होतो पण फक्त पक्षाच्याच लोकांचा सन्मान करण्यात आला. मात्र वेळ हा बदलत असतो, आमची वेळ येईल तेव्हा हिशोब चुकता होईल” असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/446576316846034