शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेची मोठी घोषणा: 31 मार्चपूर्वी कर्जफेडीवर शून्य टक्के व्याज !

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील सर्व विकास कार्यकारी सोसायटी व बँकेच्या वैयक्तिक कर्जदार शेतकरी सभासदांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सन 2024-25 या चालू आर्थिक वर्षात घेतलेल्या पीक कर्जाच्या फक्त मुद्दल रकमेचा भरणा 31 मार्च 2025 पूर्वी केल्यास शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही संधी साधून कर्जफेड करून फायदा करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

यासोबतच, शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाची रक्कम मुदतीत भरता यावी म्हणून बँकेने 30 आणि 31 मार्च 2025 या सुटीच्या दिवशी देखील सर्व शाखा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्जदार सभासदांनी या विशेष सोयीचा लाभ घ्यावा आणि आपले कर्ज वेळेत परतफेड करून पुढील वाढीव दराने नवीन पीककर्ज घेण्यास पात्र व्हावे.

थकबाकीदार सभासदांसाठी बँकेने एकरकमी परतफेड योजना लागू केली आहे. या योजनेचा लाभ घेऊन कर्ज खाते 31 मार्च 2025 पूर्वी निकाली काढल्यास शेतकरी नवीन कर्ज घेण्यास पात्र ठरतील. त्यामुळे बँकेच्या सहकार्याने आपल्या आर्थिक स्थैर्यास चालना देण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

बँकेने 2024-25 या कालावधीत प्राथमिक कृषि पतसंस्था व थेट कर्जवाटपाच्या माध्यमातून 2 लाख शेतकऱ्यांना 1052 कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित केले आहे. यात 1 लाख 59 हजार सभासदांना पतसंस्थांमार्फत 714 कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले असून, 41 हजार शेतकऱ्यांना बँकेमार्फत थेट 238 कोटी रुपयांचे कर्ज दिले गेले आहे. मात्र, प्राथमिक कृषि पतसंस्थांच्या 87 हजार शेतकरी सभासदांकडे अद्याप 477 कोटी रुपयांची थकबाकी आहे.

शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्जाची परतफेड 31 मार्च 2025 पूर्वी केल्यास त्यांना शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कर्जदार शेतकरी सभासदांनी मुदतीत कर्ज भरणा करून बँकेला सहकार्य करावे आणि पुढील आर्थिक वर्षासाठी नव्याने कर्ज घेण्यासाठी पात्र ठरावे, असे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.

Protected Content