ब्रिसबन-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक गाब्बा स्टेडियम २०३२ च्या ऑलिंपिक स्पर्धेनंतर पाडण्यात येणार आहे. गाब्बा हे क्रिकेट स्टेडियम ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा गड म्हणून ओळखले जाते. २०२१ मध्ये भारतीय संघाने याच मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवत ऑस्ट्रेलियाचा ३२ वर्षांचा अपराजित विक्रम मोडला होता.
क्वीन्सलँड राज्याचे प्रीमियर डेव्हिड क्रिस फुली यांनी मंगळवारी ऑलिंपिकसाठीच्या पायाभूत सुविधांसंबंधी नवीन योजना जाहीर केल्या. त्यानुसार, ब्रिस्बेनमधील व्हिक्टोरिया पार्क येथे नवीन स्टेडियम उभारण्यात येणार असून, त्याची क्षमता ६०,००० प्रेक्षकांची असेल. या स्टेडियमच्या निर्मितीसाठी सुमारे ३.८ अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर्स खर्च अपेक्षित आहे. ऑलिंपिक खेळांचे प्रमुख सामने येथे आयोजित केले जातील.
गाब्बा स्टेडियमचा पहिला कसोटी सामना १९३१ मध्ये खेळवण्यात आला होता, तर हे स्टेडियम १८९५ मध्ये बांधण्यात आले. सध्या येथे ३७,००० प्रेक्षक बसू शकतात. या मैदानाचे स्टॅनली स्ट्रीट एंड आणि व्हल्चर स्ट्रीट एंड अशी दोन टोके आहेत. येथे क्रिकेटशिवाय ऑस्ट्रेलियन फुटबॉल आणि रग्बीसारखे अन्य खेळही खेळले जातात.
१९८८ पासून ऑस्ट्रेलियाने गाब्बावर एकही कसोटी सामना गमावलेला नव्हता, परंतु जानेवारी २०२१ मध्ये भारतीय संघाने हा विक्रम खंडित केला. दुसऱ्या डावात ऋषभ पंतने नाबाद ८९ धावांची शानदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. शुभमन गिल (९१) आणि चेतेश्वर पुजारा यांच्या अर्धशतकांनीही विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा ऐतिहासिक सामना जिंकला. गाब्बा स्टेडियम पाडण्याच्या निर्णयामुळे क्रिकेट विश्वात मोठी चर्चा रंगली असून, क्रिकेट चाहत्यांसाठी हे एक भावनिक क्षण ठरणार आहे. व्हिक्टोरिया पार्क येथे उभारले जाणारे नवीन स्टेडियम भविष्यात क्रिकेट आणि इतर क्रीडा स्पर्धांसाठी एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल.