रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातील महात्मा गांधी चौक परिसरात काल रात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्रीत चार दुकानांना लक्ष्य केले. यापैकी तीन दुकानांमधून मोठी चोरी झाली असून, चौथ्या दुकानाचे कुलूप तोडण्यात आले असले तरी चोरी टळली आहे. या धाडसी प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरीच्या या घटना शहराच्या मध्यवर्ती असलेल्या महात्मा गांधी चौक परिसरात घडल्या. महेंद्र ताराचंद्र लोहार यांच्या ‘न्यू मनोज जनरल स्टोअर्स’चे कुलूप तोडून, शेख सादिक यांच्या ‘युनिक किराणा स्टोअर’चे शटर वाकवून, तर भूषण कोळी यांच्या ‘महादेव मेडिकल’चे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. शरीफभाई पन्नीवाले यांच्या दुकानाचे कुलूप तोडण्यात आले असले तरी, त्यांच्या दुकानातून कोणतीही वस्तू चोरीला गेली नाही.
सकाळी हा प्रकार समोर येताच, परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काही नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री १२ ते पहाटे ५ दरम्यान शहरात मोटरसायकलवरून वाळू तस्कर फिरताना दिसतात. अनेकदा नागरिक त्यांना वाळू तस्कर समजून दुर्लक्ष करतात, ज्यामुळे अनोळखी व्यक्तींना शहरात वावरण्याची संधी मिळते.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकारानंतर संतप्त नागरिकांनी रात्रीची वाळू तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी या सर्व चोरीच्या घटनांची सखोल चौकशी सुरू केली असून, चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेतला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे रावेर शहरातील रात्रीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.