नाडगाव मंडळात ‘महाराजस्व समाधान शिबिरा’ला प्रतिसाद; ११७ लाभार्थ्यांना मिळाला लाभ


बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरां’तर्गत नाडगाव मंडळात, शिरसाळा येथील हनुमान मंदिराजवळील हॉलमध्ये काल २६ जून एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील १५ गावांचे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली, आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला. एकूण ११७ लाभार्थ्यांना या शिबिरात विविध दाखले व साहित्याचे वाटप करण्यात आले.

या शिबिराचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन समस्या आणि तक्रारींचे जागेवरच निराकरण करणे हा होता. बोदवडचे तहसीलदार श्री. अनिल पुरे यांनी प्रास्ताविक करताना शिबिराच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यावेळी विविध लाभाथ्यांना प्रमाणपत्रे आणि इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.

शिबिरात विविध विभागांकडून सेवा पुरवण्यात आल्या. संजय गांधी योजनेअंतर्गत ५ लाभार्थ्यांची DBT प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, तर अॅग्रोस्टॅकचे ४ लाभार्थ्यांना फायदा झाला. तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत १० सेवा पुरवण्यात आल्या. पुरवठा शाखेमार्फत १२ शिधापत्रिकांचे वाटप झाले, तर सेतू केंद्राद्वारे २२ उत्पन्नाचे दाखले, ९ जातीचे दाखले आणि १५ वय, अधिवास व रहिवास दाखले देण्यात आले. जिवंत सातबाराचे ६, तुकडा ४ आणि अ.पा.क. शेरा कमी करण्याचे १ प्रकरण मार्गी लागले. पशुसंवर्धन विभागाने ५ मका बियाणे किटचे वाटप केले, तर शिरसाळा ग्रामपंचायतीने ५ जन्म प्रमाणपत्रे, ३ मृत्यू प्रमाणपत्रे आणि १ विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले. आशा वर्करना १ बेबी केअर किट देण्यात आले, तर शिक्षण विभागाने १४ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट आणि सॉक्सचे वाटप केले.

मंडळ अधिकारी श्रीमती कल्पना गोरले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर तलाठी श्री. खराटे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी बोदवडचे नगराध्यक्ष, गटशिक्षणाधिकारी, डॉ. उद्धव पाटील, श्री. प्रमोद धामोडे, तसेच सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, लाभार्थी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना एकाच छताखाली अनेक सुविधा मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.